राहू : पुढारी वृत्तसेवा : चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार, तर अन्य तीन जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. 6) रात्री दीड वाजेच्या सुमारास राहू-केडगाव रस्त्यावरील नाथाची वाडी (ता. दौंड) येथे घडली. अतिशय वेगाने ही कार नाथाची वाडी येथील एका नागरिकाच्या घरासमोरील संरक्षक भिंत तोडून उलटली.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मारुती स्विफ्ट (एमएच 12 एनबी 2699) कारमध्ये बाबासाहेब गौतम साठे, रोहित देविदास शिंदे, गोरख अडागळे, दत्ता सुदाम मस्तुद आणि प्रदीप बाळासाहेब करचे असे सर्वजण मिळून ट्रकचे साहित्य आणण्यासाठी केडगाव-चौफुला या ठिकाणी गेले होते. रात्री 1.10 च्या सुमारास प्रदीप करचे यांना घरी सोडून हे सर्व खुटबाव-पिंपळगाव रस्त्याने निघाले. दरम्यान काही अंतरावरच स्विफ्ट चालक दत्ता मस्तुद याचा कारवरील ताबा सुटून कार समोरील बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर जोरदार आदळून अपघात झाला.
या अपघातातील जखमींना केडगाव (ता. दौंड) येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर बाबासाहेब साठे (वय 36, रा. पिंपळगाव, ता. दौंड) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक दत्ता मस्तुद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.