देवगड (सिंधुदुर्ग) : सूरज कोयंडे
देवगडचे अर्थकारण बदलणार्या आनंदवाडी बंदर प्रकल्पासाठी 18 कोटी 28 लाख निधी मंजूर झाल्याने काम लवकरच सुरू होणार असे म्हटले जात होते. मात्र, अद्यापही काम असल्याने मच्छीमार व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करावे याबाबत ठेकेदाराशी संपर्क केल्यानंतर सुरू करतो असे सांगितले, अशी माहिती देवगड फिशरमेन्स सोसायटीचे चेअरमन द्विजकांंत कोयंडे यांनी दिली. मात्र अद्यापही प्रकल्पाचे काम सुरू केले नसल्याचे त्यांनी सांगितले. मच्छीमार संस्था पदाधिकारी व मच्छीमार प्रकल्पाचे काम लवकर सुरू करावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. ठेकेदाराशी संपर्क साधत आहेत. मात्र निधी मंजूर असूनही प्रकल्पाचे काम अद्याप सुरू का होत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
देवगडवासीयांची मागणी असलेला आनंदवाडी प्रकल्पाचे काम गेले दहा वर्षे बंद अवस्थेत होते. या प्रकल्पाच्या आराखड्यात बदल केल्यानंतर पुढील कार्यवाहीला सुरूवात झाली आणि सुमारे 88 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्याचेे काम युध्दपातळीवर सुरू झाले.कोरोना संकटामुळे काही महिने हे काम बंद होते. त्यानंतर या कामाला वेगाने सुरूवात झाली. जेटी व भरावाचे काम युध्दपातळीवर सुरू होते. या प्रकल्पाचे भरावाचे काम सुरूवातीला सुरू करण्यात आले तर बिल्डींग बांधकाम व पाईलिंगचे काम त्यानंतर सुरू झाले. जेटी व भरावाचा कामाबरोबरच गाळ काढण्याचे काम 18 एप्रिल 2021 पासून सुरू करण्यात आले होते. जेटी व भरावाचे काम जून महिन्यापर्यंत पूर्णत्वास जाईल असे सांगण्यात येत होते तर जानेवारी 2022 पर्यंत 95 टक्के काम पूर्णत्वास जाईल अशी शक्यता होती. मात्र सध्या प्रकल्पाचे काम ठप्प आहे. दोन तीन महिने धीम्यागतीने सुरू होते. त्यानंतर तीन-चार महिने बंद अवस्थेतच आहे.
प्रकल्पाचे काम नेमके बंद का असा प्रश्न मच्छीमारांमधून व्यक्त होत असून या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मच्छीमारांमधून होत होती. यानंतर मच्छीमारांच्या विविध समस्यांबाबत आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, नगरसेवक संतोष तारी यांच्याबरोबर मच्छीमार प्रतिनिधी संतोष खांदारे, जगन्नाथ कोयंडे, कृष्णा परब, धनंजय जोशी, बाबी तेली आदी मच्छीमार व मच्छीमार संस्था प्रतिनिधी यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची मुंबईमध्ये भेट घेतली. यावेळी देवगड येथील आनंदवाडी बंदर प्रकल्पाचे काम बंद आहे. हा प्रकल्प मच्छिमारांसाठी गरजेचा आहे.प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करावे अशी मागणी मच्छीमारांनी केली.
त्यानंतर या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने 3.12 कोटी व राज्य शासनाने 15.16 कोटी असे एकूण 18 कोटी 28 लाखांचा निधी वितरित केला. त्यामुळे गेले काही महिने बंद असलेले प्रकल्पाचे काम लवकच पुन्हा जोमाने सुरू होईल असे म्हटले जात होते. मात्र अद्यापही प्रकल्पाचे काम ठप्प आहे. ठेकेदाराचे काही कामगार कामाच्या ठिकाणी आल्याचे दिसत आहेत. मात्र, काम अद्याप सुरू झाले नसल्याने मच्छीमार व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.