तारापूर मधील स्फोटात दोघांचा मृत्यू

तारापूर मधील स्फोटात दोघांचा मृत्यू
Published on
Updated on

बोईसर ; पुढारी वार्ताहर : तारापूर एमआयडीसीतील जकारिया इंडस्ट्रीज या कपड्यावर प्रक्रिया करणार्‍या टेक्स्टाईल कारखान्यातील थरमोपॅक विभागात शनिवारी पहाटे 5 वा. 40 मि.दरम्यान स्फोट होऊन संपूर्ण तारापूर एमआयडीसी हादरली. या भीषण स्फोटात दोघांचा मृत्यू झाला, तर पाच कामगार गंभीर जखमी झाले.

स्फोटाचा आवाज इतका भयानक होता की, 5 कि. मी.पर्यंतचा परिसर हादरला. दुपारपर्यंत धुमसणारी ही आग तारापूर अग्निशमन दलाने 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नियंत्रणात आणली.

या भीषण स्फोटात मिथिलेश राजवंशी (38) हा कामगार पूर्णतः जळून त्याच्या शरीराचा अक्षरशः कोळसा झाला, तर छोटेलाल सरोज (37) याचा मृतदेह संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान सापडला. फिटर म्हणून काम करणारा मुकेश यादव (30), बॉयलर हेल्पर अमित यादव (26) आणि मुरली गौतम (30), बॉयलर ऑपरेटर गणेश पाटील(38) आणि उमेश राम (42) हे जखमी झाले असून उमेशची प्रकृती गंभीर आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी व जखमींना उपचारानंतर पुन्हा कायमस्वरुपी नोकरीवर घ्यावे, अशी मागणी हिंद भारतीय कामगार सेनेच्या नीलम संखे यांनी केली.

असा झाला अपघात

थर्मिक फ्युइड हिटरमध्ये ऑइल गरम करून ते प्लांटमधील टेक्स्टाईल मशीनवर फिरवले जात असताना थर्मिक फ्युइड हिटरमधील कॉइलचा भीषण स्फोट झाला. त्यामधील उकळते ऑईल सर्वत्र बाहेर फेकले जाऊन आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

पालघरवासीय पहाटे साखर झोपेत असताना अचानक स्फोट झाला. यावेळी नेमके काय घडले, ते निश्चित न कळल्याने ते रस्त्याच्या दिशेने सैरावैरा धावू लागले. या गोंधळाच्या परिस्थितीमुळे कामगारांचे नातेवाईक प्रचंड चिंताग्रस्त होऊन कारखान्याच्या प्रवेशद्वारावर जमा झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news