

मंठा; पुढरी वृत्तसेवा : तालुक्यातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर परिसरातील अकरा गावांत एक गाव एक गणपतीची पंरपरा गेल्या दहा वर्षांपासुन जपली जाते. ही पंरपरा यावर्षीही कायम असल्याचे दिसून आले. तालुक्यातील देवगाव खवणे येथील श्रीक्षेत्र ओंकारेश्वर परिसरातील अकरा गावात एक गणपती बसविला जातो.
परिसरातील गणेशपुर, वरुड, वाघोडा, माहोरा, वैद्य वडगाव, अंभोरा जहागीर, माळतोंडी येथील नागरिक दरवर्षी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत श्री गणेशाची स्थापना करतात. श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथील महंत भागवतगिरी महाराज व बालकगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली परिसरातील गावकरी एकत्र येऊन मागील दहा वर्षापांसून एकाच गणपतीची स्थापना करतात. या
दहा दिवसाच्या कालावधीमध्ये श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होतो. या महोत्सवातील दिनचर्यानुसार सकाळी चार ते सहा काकडा भजन, सहा ते सात प्रार्थना, विष्णुसहस्त्रनाम व शिव महिमा स्तोत्र, सकाळी सात ते आठ या वेळेत गणरायाची आरती व यानंतर उपस्थित भक्तांना अल्पोहार मंडळाच्या वतीने दिला जातो.
सकाळी 9 ते 11 या वेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व 11 ते 01 हरिकीर्तनाचे आयोजन केले जाते. दुपारी एक ते चार महाप्रसाद, चार ते पाच प्रवचन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व रात्री सात ते आठ या वेळेत गणरायाची आरती,रात्री 09 ते 11 हरी जागर असा दैनंदिन कार्यक्रम गणेशोत्सवात आयोजित केलेला आहे. श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथील अकरा गाव एक गणपती ही संकल्पना सर्व गणेश मंडळांनी घेण्यासारखा आदर्श असून एकोप्याचे खरे दृश्य या ठिकाणी पहावयास मिळते.गणेशोत्सवात या ठिकाणास
यात्रेचे स्वरूप आलेले असते.