गुढीपाडव्याचा भावार्थ

गुढीपाडव्याचा भावार्थ

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

गुढीपाडवा हा सण कृषी संस्कृतीशी आणि शालिवाहनांच्या पराक्रमांशी निगडित आहे. लोकसाहित्यातील सांस्कृतिक खाणाखुणा जपत आजही तेवढ्याच उत्साहाने हा सण साजरा होतो.

भारतीय सण-समारंभाला स्वतंत्र सांस्कृतिक अर्थ आहे. तो समजावून घेतला असता, हा सुवर्णधागा चांगल्या प्रकारे प्रकाशमान करता येईल. चैत्र महिन्याच्या आरंभी येणारा गुढीपाडवा म्हणजे सातवाहन काळापासून साजरा केला जाणारा हिंदू संस्कृतीमधील नववर्षाचा पवित्र व मंगलमय दिवस होय. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी पर्यावरणात होणारा बदल प्रफुल्लित करणारा असतो. 'वेदांग ज्योतिष' या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. त्याचे कारण असे की, पर्यावरणात होणारे संक्रमण मानवी जीवनाला संपन्न करणारे ठरले आहे. या दिवशी कृषी क्रांतीमधील नव्या धनधान्याचे गुढी उभारून स्वागत केले जाते.

तसेच हिंदू पराक्रमाच्या गाथाही गायिल्या जातात. या दिवशी सबंध दक्षिण भारतावर राज्य करणार्‍या सातवाहन सम्राटांनी शालिवाहन शक या नावाने नवे संवत्सर पर्व सुरू केले. नालासोपारा या बंदरातून पश्‍चिम घाटातील नाणेघाट ही खिंड चढून जुन्नरकडे जाणार्‍या स्थळी सातवाहन सम्राटांनी लेणी कोरली व त्यामध्ये आपल्या पराक्रमाची गाथा रचली. पश्‍चिम भारतात 450 बौद्ध लेणी सातवाहन काळात कोरण्यात आली. शकांच्या आक्रमणाने अस्थिर झालेल्या उत्तर भारताला राजकीय स्थैर्य देता आले नव्हते. तेव्हा दक्षिणेने भारतीय संस्कृतीचे तारू सुरक्षित ठेवले.

जुने संदर्भ, नवा अर्थ

या दिवशी शालिवाहन सम्राटाने नवीन कालगणना म्हणून संवत्सराची सुरुवात केली. स्वतः कवी असलेल्या हाल राजाने लिहिलेल्या 'गाथा सप्तशती' या ग्रंथामध्ये तत्कालीन लोककथांचे गोंदण स्पष्ट होते. हा ग्रंथ प्राकृत भाषेत लिहिला आहे. सातवाहनकालीन समृद्ध लोकजीवनाचे प्रतिबिंब या ग्रंथातून उमटले आहे. प्रतिष्ठान ऊर्फ पैठण ही सातवाहनाची राजधानी होती. शिवाय, कराड, नाशिक, भोकरदन, तगरपूर ही सातवाहन काळातील समृद्ध नगरे होती. टॉलेमीच्या भूगोलात या स्थळांचे वर्णन आलेले आहे.

गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी नवे संकल्प केले जातात. वास्तुप्रवेश तसेच वाहन खरेदी आणि लोककल्याणकारी व्यवसायाला प्रारंभ करावयाचा हा दिवस आहे. प्रभू रामचंद्रांचे अयोध्येतील आगमन याच दिवशी झाले. म्हणून सबंध देशभरात गुढी उभारून आनंद व्यक्त केला जातो. सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांचे राज्य कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही होते. तेथेही गुढीपाडवा हा सण 'उगादी' म्हणून साजरा केला जातो. सिंध प्रांतातसुद्धा 'चेटीचंद' या नावाने साजरा होतो. यावरून प्राचीन काळात सातवाहनाची सत्ता सिंध प्रांतात पोहोचल्याचे सिद्ध होते.

गुढीपाडव्याच्या दिवशी काठीवर गुढी उभारून तिची पूजा केली जाते ती विजयाचे प्रतीक म्हणून. पूर्वेकडील त्रिपुरा, मणिपूर, नेपाळ, आसाम तसेच पुढे आग्नेय आशियातील इंडोनेशिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया या देशांतही काठी पूजेची परंपरा आहे. भारतामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश व ओडिशा या राज्यांतूनही काठी व गुढी पूजनाची परंपरा दिसते. पूर्वीच्या अखंड भारतातील बलुचिस्तान प्रांतातसुद्धा हिंगुलांगिका देवीची पूजा काठीने मिरवणुका काढून केली जाते. गुढी व काठी ही जुनी प्रतीके आहेत. त्यांचा नवा अर्थ लक्षात घेतला पाहिजे.

सोन्याचे तेजस्वी कण

नदी अखंडपणे वाहते आणि वाळूच्या कणाबरोबर सोन्याचे कण मागे ठेवते. तसेच सण-समारंभांच्या इतिहासाचे आहे. महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळसाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली, असा संदर्भ येतो. कृष्णाने त्याच्या सवंगड्यांसह असा उत्सव साजरा केल्याचा संदर्भ पुढे येतो.

महाभारतातसुद्धा हा उत्सव वर्ष प्रतिपदा उत्सव म्हणून साजरा केल्याचा संदर्भ सापडतो. ब्रह्मदेवाने या दिवशी विश्‍वनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली, असे वेदात प्रतिपादन केले आहे. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला, अशी लोकपरंपरा प्रचलित आहे. वनवास काळात प्रभू रामचंद्रांना सहाय्य करणार्‍या वनवासी जातीसुद्धा या काळात रामकथा गातात. लोककथांमधील प्रभू रामचंद्रांचे जीवन हे नागरी जीवनापेक्षा अधिक उच्च स्वरूपाचे आहे. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या सहाय्याने याच दिवशी शकांचा पराभव केला, अशी लोककथा प्रचलित आहे. त्याचा अर्थ एवढाच की, बहुजनातून पुढे आलेल्या शालिवाहनाने बलाढ्य साम्राज्य उभारून आपले कर्तृत्व सिद्ध केले. 'सत्यवत गोदावरी' या नाटकात श्री. दि. इनामदार यांनी या लोककथेवर आधारित नाटक रचले आहे व खरे काय आहे, हे आपण गोदावरी नदीलाच विचारावे, असे आवाहन केले आहे.

आदिशक्ती पूजनाचे महत्त्व

गुढीपाडवा हा शंकर व पार्वती यांच्या विवाहाचा पर्वकाल मानला जातो. पार्वती आणि शंंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. हा सर्व काळ चैत्र नवरात्र म्हणूनही साजरा केला जातो. पुढे अक्षयतृतीयेस पार्वती सासरी जाते व माहेरी परतते तेव्हा चैत्र गौरीचा सण साजरा केला जातो. या सर्व परंपरांचाच उल्लेख कालिदासांच्या 'रघुवंश' आणि 'मच्छीकटीकम' या नाटकात आला आहे. तसेच कवी भासाने रचलेल्या 'मध्यव्यायोग' या नाटकातही या परंपरेचे काही दुवे शोधता येतात. गुढीपाडव्याच्या सणाभोवती आदिशक्तीच्या पूजनाचाही संदर्भ आला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचा सन्मान ही एक अर्थपूर्ण बाब होय.

गुढी : काही मौलिक संदर्भ

गुढीबाबत प्राचीन संस्कृत ग्रंथातून इंद्रध्वज व ब्रह्मध्वज असा अर्थ आढळतो. गुढी या शब्दाचा अर्थ समजून घेताना तेलगू भाषेतील या शब्दाची उत्पत्ती लक्षात घेतली पाहिजे. दाते, कर्वे कोषात गुढी या शब्दाचा अर्थ लाकूड किंवा काठी असा देण्यात आला आहे. कुडी हा हिंदी शब्द समानार्थी असून, तो गुढीशी मिळताजुळता आहे. भारतीय परंपरेनुसार आयुर्वेदिक दृष्टीने कडुलिंबाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचा उपयोग स्नानासाठी केला जातो. लीळाचरित्र तसेच संत नामदेव, एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा यांच्या साहित्यातही गुढीपाडव्याचे संदर्भ येतात. 'ज्ञानेश्‍वरी'मध्ये 4, 6 व 14 व्या अध्यायात गुढीचा संदर्भ येतो. अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ असे ज्ञानेश्‍वर म्हणतात.

गुढीपाडवा हा सण कृषी संस्कृतीशी आणि शालिवाहनांच्या पराक्रमांशी निगडित आहे. लोकसाहित्यातील सांंस्कृतिक खाणाखुणा जपत आजही तेवढ्याच उत्साहाने हा सण साजरा होतो. लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. सरोजिनी बाबर यांच्या मते, गुढीपाडव्यास लोकसंस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षणामुळे भूमी सुफलित होते. असा हा सर्जनाला मिळणार्‍या ऊर्जेशी जोडलेला आहे. काळाचा प्रवाह कितीही पुढे सरकला, तरीही भारतीय माणूस हा कृषी संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरेशी नाळ जोडणारा आहे. भारतीय संकृती आग्नेय आशियापर्यंत पोहोचली आणि तिने अर्ध्या जगाला नवीन सांस्कृतिक प्रतीके दिला. बहुजन समाजातील कृषी जीवनाच्या सर्जनशील अभिव्यक्तीचा आविष्कार गुढीपाडवा आजही करत आहे आणि पुढेही करीत राहील. गोदावरीच्या अखंड प्रवाहाप्रमाणेच महाराष्ट्र संस्कृतीचा हा ठेवा सतत नवा प्रकाश देत राहील, यात शंका नाही.

स्वातंत्र्यानंतर बदलत्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीत सणांचे महत्त्वही बदलत आहे. आपल्या मागील चुका दुरुस्त करून पुढील वाटचालीत नवे संकल्प करताना इतिहासाचे भान कसे ठेवावे व त्याकडे कसे पाहावे, हे आपण सणांच्या सांस्कृतिक जडणघडणीतून शिकू शकतो. प्रांतोप्रांती गुढीपाडव्याचे महत्त्व भिन्न असले, तरीही त्याचा आत्मा भारतीय आहे. भारतातील प्राचीन महाकाव्यापासून संस्कृत नाटकांपर्यंत तसेच चक्रधरांचे लीळाचरित्र, ज्ञानेश्‍वरी, नामदेव, तुकाराम, एकनाथ, जनाबाई, चोखामेळा यांच्या संत साहित्यातसुद्धा गुढीपाडव्याचा संदर्भ आला आहे. पाप-पुण्याचा हिशेब न करता जीवन गंगेच्या प्रवाहासारखे शुद्ध व सात्विक असावे. त्यातून सार्थ जीवनाचा संदेश प्रकट व्हावा, विजयाची गुढी उभारताना अभिमान जरूर असावा; पण अहंकाराचा वारा लागू नये याचेही भान ठेवले पाहिजे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news