कुर्डूवाडीत अतिक्रमणे हटवल्याने रस्ते झाले मोठे

अतिक्रमणे
अतिक्रमणे

कुर्डूवाडी : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील अंतर्गत रस्ते कामाला सुरुवात झाली तेव्हापासून मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड व बांधकाम अभियंता अक्षय खटके यांनी अतिक्रमण विरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणच्या रस्त्यालगतची अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. रस्ते काम गतिमान आहे, त्याप्रमाणे अतिक्रमण हटवण्याचे काम चालू आहे. या कारवाईमुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

भुयारी गटारीच्या व शहरातील विविध विकासकामात निकृष्ट काम झाल्याचा आरोप करत विरोधकांनी काम सुरू करण्यास आक्षेप घेत मुख्याधिकार्‍यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मुख्याधिकारी यांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारल्याने अखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली तरी रस्ता सुरू झालेल्या ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. गांधी चौकातील मिठाई गल्ली, टिळक चौक येथे सध्या अतिक्रमणविरोधी मोहीम चालू आहे.

शिवाजी चौक येथील अतिक्रमण तर पोलिस बंदोबस्तात काढण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या शहरातील राजेंद्र चौक, पंजाब तालीम ते जनता बँक, पोस्ट रोड व नवी पेठकडे जाणारा रोड या अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. यातील पोस्ट रोडवर व राजेंद्र चौकात नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे व दुकानांसमोर उभ्या केलेल्या दुचाकींमुळे 25ते 30 फूट असलेला रस्ता केवळ 12 ते 15 फुटांच्या जवळपास राहिला होता. याचा परिणाम रहदारीवर होत होता.

आता दुकानांसमोर उभे केलेले पत्र्याचे शेड, पायर्‍या आदींचे असलेले अतिक्रमण काढून टाकल्याने रस्ता मोठा झाला आहे. यामुळे रहदारीला होणारा अडथळा कमी झाला आहे. कुर्डूवाडी शहरात रस्ते करण्यासाठी 70 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, त्यातून ही रस्त्याची कामे चालू आहेत. गेली पंधरा वर्षे कुर्डूवाडी शहरातील रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत होते. शहरातील खराब रस्त्यांमुळे अनेकांना मणक्यांचे आजार जडले आहेत. या पाच वर्षांत सत्ताधारी नेतेमंडळींच्या काळात शहरातील नागरिकांना सर्वात जास्त त्रास झाल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. वाढलेली अतिक्रमणे काढूनच रस्ते करण्यात यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news