कराड महापूर : घरपण हरवलेल्या आंबेघराची करुणकहाणी

महापूर : घरपण हरवलेल्या आंबेघराची करुणकहाणी
महापूर : घरपण हरवलेल्या आंबेघराची करुणकहाणी
Published on
Updated on

कराड; सतीश मोरे : गेली एकवीस वर्षे पुढारीमध्ये काम करत आहे. या काळात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचे कव्हरेज केले आहे.राजकीय असो, सामाजिक असो, भूकंपाचे असो, पुराचे असो किंवा एखाद्या मोठ्या अपघाताचे असो. या काळात कधीही बातमी करताना डोळ्यातून पाणी आलं नाही,हात थरथरले नाहीत. मात्र काल आंबेघर गावात काळजाला पिळवटून टाकणारे दृश्य पाहून कालचा दिवस आयुष्यातील सर्वात दुःखद असाच म्हणावा लागेल. जवळचे नातेवाईक मरण पावल्यानंतर आपल्या डोळ्यातून सहज पाणी येते. आंबेघरात 11 जणांना डोळ्यासमोर अग्नी देताना पाहून हुंदके देऊन ढसाढसा रडू कोसळलं.

आंबेघर गावात जाण्यासाठी आमचे दुपारी बारा वाजता नियोजन झाले. या गावात मोठ्या प्रमाणात मदत कार्य शासकीय पातळीवर चालू आहे. आपण बातमीच्या कामासाठी निघालोय खरं पण आपण आणखी काय करू शकतो असा विचार कालचं मनात आला होता. त्यानुसार नियोजन केले होते.रणजीत पाटील मित्र परिवार,निसर्ग वारी ग्रुप,पुढारी परिवार आणि डी स्काय हॉटेल आम्ही सर्वांनी मिळून नियोजन केले, त्याला हॉटेल शिवराज ढाबाच्या नामदेव थोरात यांनी साथ दिली. दुपारी १ वाजता शिवराजकडून मिळालेली शंभर अक्का मसूरची पाकीटे तसेच डी स्काय हॉटेल येथे तयार केलेले तितकीच राईसची पाकिटे आणि दोनशे चपात्या पाकिटे, 100 पाणी बाटल्या असे सर्व साहित्य ईसुजी गाडीमध्ये टाकून माझ्यासहित रणजीत पाटील, चंद्रकांत पाटील, सतीश भोंगाळे, किशोर पाटील आम्ही सर्वजण मोरगिरीला जायला निघालो. दुपारी सायंकाळी चारच्या दरम्यान आम्ही मोरगिरीमध्ये पोहोचलो. आंबेघरला जाणारा रस्ता मोरणा गुरेघर धरणाच्या अगोदर तीन चार ठिकाणी वाहून गेला होता.आम्ही धावडे गावाजवळ पोहोचलो.रस्त्याच्या दोन्ही बाजूला मदतकार्यासाठी आलेली सर्व चारचाकी वाहने उभी होती. आम्ही तिथे पोहोचल्यानंतर दहाच मिनिटात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे आगमन झाले. त्यांना भेटून आम्ही याठिकाणी का आलो आहे ते सांगितले. आमच्या गाडीतून अन्नाची पाकिटे पिशव्या सर्व आदी साहित्य उतरवले. धावडे गावापासून मोरणा धरणापर्यंत जाण्यासाठी रस्ता खचलेला असला तरी गृहमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जेसीबीची व्यवस्था केली होती. या जेसीबीमध्ये जेवण पाकिटाच्या चार पिशव्या ठेवल्या. जेसीबी केबिनमध्ये ड्रायव्हर, नामदार देसाई, त्यांच्या शेजारी मी,सोबत दोन बॉडीगार्ड, दोन कार्यकर्ते बसले. तर पुढे जेसीबीच्या बकेटमध्ये माझ्यासोबत आलेले सर्व सहकारी बसले. मंत्र्यांसोबत याअगोदर कार मधून मी अनेकदा प्रवास केला आहे, मात्र जेसीबी मधून मंत्र्यांसोबतचा प्रवास वेगळाच अनुभव होता.

मोरणा धरणापर्यंत जाणार्‍या या रस्त्यावर अनेक ठिकाणी खचाखच गाळ साचलेला होता,बारीक दगड वाहून आलेले होते. एक दोन ठिकाणी तर रस्ता पूर्ण वाहून गेलेला होता. मात्र या रस्त्यातून आमचा जेसीबी पुढे जात होता. यादरम्यान नामदार देसाई यांच्यासोबत चर्चा सुरू होती. संकट पाटण तालुक्याला नवीन नाही मात्र प्रत्येक वेळी पाटण तालुका या संकटातून उभा राहिला आहे. या संकटाच्या वेळी मी माझ्या तालुक्या सोबत आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई पाटण तालुक्यात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अनेकदा धावून गेले होते, मी त्यांचा नातू आहे. माझ्या लोकांच्या मदतीला धावून जाणं हे माझे कर्तव्य आहे, असे नामदार देसाई यांनी मला कृतज्ञतापूर्वक सांगितले.

आमचा जेसीबी हळू पुढे जात होता. रस्त्यात सारा चिखल होता, मात्र तेथील एक स्थानिक व्यक्ती कोणत्या बाजूला खड्डा आहे, कुठे चिखल आहे याची माहिती बाहेर उभा राहून देत होता. जेसीबी मधून एक मंत्री प्रवास करत आहे हे समोरून येणारे अनेक कौतुकाने पाहत होते.जेसीबी ड्रायव्हरच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडे होते. त्यांने आम्हाला अतिशय सुरक्षितपणे पुढे नेले. एक-दोन ठिकाणी बकेट मधील आमच्या सहकाऱ्यांना उतरावे लागले. मात्र सुमारे दीड किलोमीटर प्रवास आमचा या जेसीबी मधून झाला. पुढे रस्त्यावर पुढे जीप अडकून पडलेली असल्यामुळे आम्ही सर्वजण जेसीबी मधून खाली उतरलो. मोरणा धरणाच्या भिंतीवर आलो. तेथून कोसळलेल्या कडा, वाहून गेलेल्या जमिनी आणि पावसाचे रौद्ररूप आम्हाला दिसत होते. चारी बाजूला नजर टाकले तर अनेक छोटे मोठे धबधबे दिसत होते. मात्र आज या धबधब्याचे सौंदर्य आम्हाला दिसत नव्हते तर या पाण्यामुळे वाहून गेलेला डोंगर, माती, या मातीखाली अडकलेले जीव एवढेच आम्हाला दिसत होते.

मोरणा गुरेघर धरणाच्या भिंती पर्यंत अर्धा किलोमीटरचा रस्ता चांगला होता.मात्र येथून पुढचे दोन अडीच किलोमीटर आमचा जो डोंगरावरचा प्रवास झाला तो अविस्मरणीय होता. पुढे रस्त्यात चपला चालणार नाहीत असे अनेकांनी सांगितले मात्र आम्ही ऐकले नाही मात्र लगेच गुडघाभर चिखलात चपला अडकून पडल्या,कशा तरी त्या चपला बाहेर काढल्या आणि एका झाडाखाली ठेवल्या आम्ही पुढे चालू लागलो.

आंबेघरला जाणाऱ्या या छोट्याशा रस्त्यावरून ग्रामस्थ रोज जातात. मात्र आज नावापुरताच हा रस्ता राहिला होता. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेलेला होता, त्यातूनच वाट काढत पाउल वाटेने आम्ही पुढे जात होतो. रस्त्यावर इतका चिखल होता की चालणे मुश्किल होते. याच रस्त्याने स्वतः गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई चालत होते. पालकमंत्री बाळासाहेब पाटील काही वेळापूर्वी याच रस्त्याने पुढे गेले होते. एक-दोन ठिकाणी आमची घसरगुंडी झाली मात्र सावरायला अनेक लोक होते. सावकाश चला, हात धरून चला असे म्हणत आम्ही चालत होतो. मदतकार्यासाठी आलेल्या परिसरातील गावातील लोक आम्हाला माहिती देत होते. चप्पल न घालता अगदी घराच्या अंगणातही न जाणारा मी आणि माझ्या सोबत असणारे सहकारी आज चिखलातून, दगडातून,ओढ्यातून, गवतातून, काट्यातून अनवाणी चालत होते. आम्हाला काही होणार नव्हते याची आम्हाला खात्री होती. कारण आमच्या सोबत एक चांगला विचार होता. भुकेलेल्या लोकांसाठी आम्ही अन्नाची पाकिटे घेऊन निघालो होतो. बातमी कव्हरेज करणे हा एक भाग होता मात्र समाजाप्रती कृतज्ञता हा दुसरा भाव होता. चौघांनी हातामध्ये पंधरा-वीस किलो वजनाच्या बॅगा घेतलेल्या होत्या. कसे बसे आम्ही चालत होतो. आम्ही कोणीही खाली पडणार नाही, आम्हाला काही होणार नाही याचीही आम्हाला खात्री होती. कारण माऊलींचा आशीर्वाद आमच्या सोबत होता.

पुढे एक मोठी ओघळ आली .या ओघळीचा काठ पुराच्या पाण्याने वाहून गेला होता. या ओढ्यात फार वेगाने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. या ओढ्यातून पलीकडे कसे जायचे असा प्रश्न होता. मात्र एकमेकाचे हात धरत आम्ही त्या ओढ्यात खाली उतरलो. सोबत मंत्री महोदय यांचे सहकारी होतेच.मंत्री महोदय पुढे गेल्यानंतर त्यांच्या अंगरक्षकांनी अक्षरश या ओढ्यातून उंचावरून आम्हाला ओढून वर घेतले.

पुढे गेल्यानंतर आम्हाला आंबेघर गावाला भेट देऊन आलेले पालकमंत्री बाळासाहेब पाटील भेटले.त्यांच्यासोबत सत्यजितसिंह पाटणकर होते. दोन्ही मंत्र्यांनी मदतकार्यविषयी चर्चा केली. ना. बाळासाहेब पाटील यांनी परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.अशा अडचणीच्या काळात सातारा जिल्हा या गावाच्या पाठीशी आहे असे त्यांनी सांगितले.

दीड तास पायी प्रवास करत, घसरत, सावरत,धडपडत आम्ही पुढे आलो. आंबेघर गाव आता पुढे दिसत होते. लांबूनच धुराचे लोट दिसत होते. हा दूर कशाचा होता याचा अंदाज आम्ही बांधलेला होता. गावाबाहेर एका शेतात एकाच कुटुंबातील चार जणांवर अंत्यसंस्कार सुरू होते, चिता पेटलेली होती.

या गावातील यापुढील एक तास मी माझ्या आयुष्यातील सर्वांत संस्मरणीय असा समजतो. या गावात गेल्यानंतर परत येईपर्यंत अंगावर शहारे येत होते. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. बोलताना किंवा पुढारी लाईव्ह करताना शब्द बाहेर पडत नव्हते. गावात प्रवेश करतानाच हृदय पिळवटून टाकणारा असा आक्रोश ऐकायला मिळाला. वृद्ध महिला, त्यांचे नातेवाईक यांचा काळजाला पिळवटून टाकणारा आक्रोश आमच्याही काळजाचं पाणी करत होता. या गावात अकरा 16 पैकी 11 जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून एनडीआरएफच्या जवानांनी बाहेर काढले होते. 6 जणांवर अंत्यसंस्कार झालेले होते, उरलेल्या व्यक्तींच्या सामुहिक अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी सुरू होती. मोठी चिता रचणे सुरू होते. भर पावसात पार्थिव जाळण्यासाठी वाळलेली लाकडी कुठून आणायची? तरीही स्थानिक ग्रामस्थ प्रयत्न करत होते.एकीकडे चिता रचण्याचे काम सुरू होते तर दुसरीकडे नातेवाईक हंबरडा फोडून रडत होते.

झोपेत मध्यरात्री दोन वाजता या गावावर निसर्गाने घाला घातला होता. खरतर आठ दहा घरं असणार हे छोटसं गाव. या घरातील अनेक जण बाहेरगावी नोकरीला असतात. त्यांच्या घरचे ज्येष्ठ मंडळी,महिला गावात असतात. सर्वजण साखरझोपेत असताना डोंगर खचला, पाण्यासोबत माती दगड धोंडे सगळं खाली आलं आणि या गावातील चार-पाच घरे या दगडामाती खाली गुडूप झाली.16 जण गाडले गेले, अनेक जनावरे मरण पावली. कोणालाही स्वतःला वाचवण्याची साधी संधीही मिळाली नाही. जे कोणी जिवंत राहिले त्यांचा आक्रोश ऐकायला आसपास खूप कमी लोक होते. त्यांनी भितीने भर पावसात रात्र जागून काढली. सकाळी येऊन खाली खालच्या गावच्या लोकांना सर्व माहिती दिली.असा दुःखद प्रसंग खरच आयुष्यात कोणाच्याही वाट्याला येऊ नये. माळीन गावापेक्षा अतिशय वाईट अवस्था या गावची झाली होती.

एक तास या गावांमध्ये आम्ही होतो. काही सुचत नव्हते. मन सुन्न झाले होते. ज्या घरामध्ये घरामधील एकही व्यक्ती जिवंत राहिली नाही त्यांच्या पुण्या-मुंबईचे नातेवाईक रडत रडत आपल्या प्रियजनांविषयी सांगत होते. कोणी कोणाचं सांत्वन करायचं हेच कळत नव्हतं.

या ठिकाणी आम्हाला पाटणचे तहसीलदार आणि एनडीआरएफ जवान भेटले. या सर्वांच्या हातामध्ये भोजनाची पाकिटे दिली मात्र या भोजनाच्या पाकिटाची आता आम्हाला गरज नाही तर या स्थानिक लोकांना गरज आहे असे एनडीआरएफच्या जवानांनी आम्हाला सांगितले. खरंच या जवानांना सलाम करावासा वाटतो. खरं तर आम्ही अन्न पाकिटे जवानांसाठी आणली होती मात्र त्यांनी या गावातील लोकांचे दुःख पाहिले होते., दिवसभर रडून रडून दमलेले ,पोटात अन्नाचा एकही घास नसलेले ग्रामस्थ त्यांनी पाहिले होते. स्थानिक लोकांच्या घरात आम्ही ती पाकिटे नेऊन दिली. जवानांसोबत चर्चा केली. दरम्यान या पथकाचे प्रमुख अधिकार्‍यांशी चर्चा केली. या जवानांमध्ये एवढा मोठा उत्साह आणि ताकत कुठून येतो याचं आश्चर्य वाटले. सकाळी आठ ते पाच अविरत हे काम सुरू होते. तीस-पस्तीस जवानांना हे काम सोपे नव्हते मात्र त्यांच्या मदतीला परिसरातील अनेक ग्रामस्थ धावून आले होते. मोरगिरी रामापुर येथील मदरसा ग्रुपमधील अनेक युवक ठिकाणी आम्हाला भेटले. त्यांनी चिखलातून,मलब्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांना मदत केली.

आंबेघर गावातील एक एक प्रसंग लिहीताना आत्तासुद्धा माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. माझ्या सारख्या संवेदनशील माणसाला एका एकाच वेळेला एवढे मृतदेह यापूर्वी पाहायला मिळाले आहेत, मात्र आंबेघर येथील आक्रोश आणि निसर्गाने संधी न देता या कुटुंबावर घातलेला घाला आणि त्यांचे पार्थिव पाहून हृदय पिळून गेले होते. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होता. बातमी हा विषय आता मागे पडला होता. आता फक्त या लोकांच्या संवेदना टिपण्या शिवाय माझ्याजवळ काहीच नव्हते.

सायंकाळचे साडेपाच वाजले होते. अंधार पडू लागला होता. आता खाली जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. जवानांनी शोध मोहीम थांबवली होती. अजूनही सहा मृतदेह ढिगाऱ्याखाली होते. हे काम ते उद्या करणार होते. आम्ही खाली उतरण्यासाठी आधाराच्या काट्या घेण्यासाठी एका घरापुढे गेलो. त्या घरात मोठा आक्रोश सुरू होता मात्र त्यांना सांत्वन करण्यासाठी आलेल्या लोकांना आम्ही धीर देऊन जेवण पाकिटे दिली. एवढे लांबून आणलेली जेवणाची पाकिटे त्यांच्याकडे दिल्यानंतर आणि ती त्यांनी खाल्ली, तो आमच्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता.

परतीचा प्रवास सुरू झाला पुन्हा दीड-दोन किलोमीटर रपेट करत आम्ही डोंगराच्या डोंगरावरून टेकडीवरून खाली उतरलो. आमच्या सोबत एनडीआरएफचे जवान होते. या जवानांनी आम्हाला अतिशय चांगली साथ दिली. खाचखळग्यातून जंगलातून चालण्याची या जवानांना सवय असते ,मात्र आम्ही नवीन होतो. आमच्यातील कोणी पडू नये म्हणून हे जवान आमच्या पुढे पाठीमागे होते. यातील काही जवानांची आम्ही आमची ओळख झाली. पेरले येथील एक जवान या ग्रुपमध्ये होता. डोंगर उतरताना या जवानांची संवाद साधता आला. साडेसहाच्या सुमारास आम्ही धरणाच्या भिंतीवर आलो. धरणाच्या भिंतीवरून वर पाहिले, अजूनही धूर येत होता. चिता दिसत नव्हती मात्र धुर दिसत होता. आमच्या डोळ्यातील अश्रूला पुन्हा एकदा वाट करून दिली.

धरणापासून पुढे पुन्हा दीड किलोमीटरची पायपीट होती. पुढे जिथे आम्ही गाड्या लावलेल्या होत्या तिथपर्यंत पोहोचलो.या ठिकाणी ओढ्यामध्ये हात पाय आणि चिखलाने माखलेली कपडे धुतली. आमच्या गाडीमध्ये ठेवलेली आणखी पन्नास पाकिटे एनडीआरएफच्या बसमध्ये ठेवली. जवानांना पाणी बॉटल दिल्या. चार तास कोणीही पाणी पिले नव्हते, घशाला कोरड पडली होती. आमच्यासोबत मदतकार्यासाठी आसपासच्या परिसरातील युवकांना सुद्धा भोजनाची पाकिटे दिली. पाटण तहसिलदारा समवेत उभे राहून सर्वांनी मिळून जेवण केले. जड पावलाने आठच्या दरम्यान कराडला यायला निघालो. कराडला पोहचल्यानंतर रणजित पाटील यांच्या क्रशरवर ज्या माउलीने आम्हाला पन्नास चपात्या तयार करून दिल्या होत्या त्यांना जाऊन नमस्कार केला. त्यांच्या हातचा मसाला चहा पिला आणि दहाच्या सुमारास आम्ही सर्वजण घरी पोहोचलो.

आज आम्ही अनुभवलेला प्रत्येक क्षण काळजावर कोरून ठेवलेला आहे. गेल्या 25 वर्षाच्या पत्रकारीता कारकिर्दीत असा काळीज पिटाळून सोडणारा प्रसंग मी अगोदर पाहिलेला नव्हता. भूकंपाच्या कालावधीत एकदा कसणी गावात जायचा प्रसंग आला होता मात्र तिथे प्राणहानी झालेली नव्हती. वित्त हानी भरून काढता येऊ शकते मात्र प्राणहानी कशी भरून काढता येणार? तरीही आंबेघर गावातील लोकांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहून त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी आपण प्रयत्न करूया.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news