करमाळा : पुढारी वृत्तसेवा
करमाळा तालुक्याला मंगळवारी रात्री अवकाळी पावसाने दणका दिला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. कोळगाव भागात अनेक घरांचे पत्रे उडून ग्रामस्थांचा संसार उघड्यावर आला आहे. वीट येथे एका बैलावर विजेची तार तुटून पडल्याने तो मृत्यूमुखी पडला आहे. तालुक्यात 68 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रोहिणी नक्षत्राच्या वादळी वार्यासह झालेल्या पावसाने शेटफळ, पोफळज, केडगाव परिसरातील अनेक शेतकर्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. करमाळा तालुक्यातील उजनी धरण काठावरील या परिसरामध्ये केळीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परिसरातील अनेक शेतकर्यांची केळी कापणीला आली होती. अशा काळात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अचानक वादळी वार्याने केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकर्यांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
पोफळज येथील बाळासाहेब पवार यांची दोन एकर केळी जमीनदोस्त झाली असून तेरा ते चौदा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबरोबरच पोफळज येथील मोहन पवार, अरूण पवार, हजारे, शेटफळ येथील धनाजी डिगे, प्रशांत नाईकनवरे, दत्तात्रय गुंड, बाबूराव गुंड, दत्तात्रय पाटील, राहुल घोगरे, राजेंद्र साबळे यांच्या केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात केळीबागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकर्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गामधून केली जात आहे. दरम्यान, निमगाव येथे तलाठी धनंजय जाधव यांनी तत्काळ येऊन पंचनामे करून घेतले आहेत. घरांचे अंदाजे नुकसान 5 ते 6 लाख रुपये झालेले आहे, शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सीना-कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ-पाटील यांनी केली.
करमाळा 3 मिमी, कोर्टी 1 मिमी, केम 9 मिमी, केतूर 20 मिमी, जेऊर 17 मिमी, सालसे 3 मिमी, उमरड 13 मिमी, अर्जुननगर 2 मिमी, असे आठ मंडलात एकूण 68 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
तालुक्यातील केळीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याच्या सूचना गावपातळीवरील कृषी विभागाच्या कर्मचार्यांना देण्यात आल्या असून याचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल व आदेश मिळाल्यानंतर पंचनामे करण्याची कार्यवाही होईल.
– संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, करमाळाकेळीचे पीक उभा करण्यासाठी एकरी दीड लाखांचा खर्च येतो, मात्र अवकाळीमुळे क्षणात केळी बाग भुईसपाट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. आमचा तीन-चार वर्षांचा अनुभव आहे. यासंबंधी शासन व प्रशासनाने कायमस्वरूपी शेतकर्यांना मदतीसाठी योग्य निर्णय घेऊन नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई मिळण्याची व्यवस्था करावी.
– प्रशांत नाईकनवरे, केळी उत्पादक शेतकरी, शेटफळतालुक्यातील निमगावात झालेल्या अवकाळी व गारा पडून फळबागाचे व पिकांचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात घरांचे बांधकाम पूर्ण जमीनदोस्त झाले आहे. बर्याच घरांचे पत्रे उडून गेले आहेत. शेतकर्यांच्या फळ बागांचेही अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ आर्थिक नुकसान भरपाई द्यावी.
– सतीश नीळ-पाटील, अध्यक्ष, सीना-कोळगाव धरणग्रस्त संघटना