औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : घाटीत एक्सरे काढण्यासाठी आलेल्या रुग्णांना चक्क स्मार्ट फोन सोबत आणण्याचे फर्मान सोडले जात आहे. स्मार्ट फोन नसेल, तर थेट बाहेरचा रस्ता दाखवला जातो. घाटीच्या या अजब कारभाराचा दररोज शेकडो रुग्णांना फटका बसत आहे. यावर कहर म्हणजे, मोबाइलमध्ये आणलेला एक्सरे स्पष्ट नाही, पुन्हा आणा. असे डॉक्टरांचे उत्तर ऐकून रुग्ण हतबल होत आहेत.
घाटीच्या एक्सरे विभागात मागील काही दिवसांपासून एक्सरे फिल्मचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दररोजच्या ओपीडीतून एक्सरे काढण्यासाठी आलेल्या रुग्णांना अॅण्ड्राइड फोन सोबत आणलाय का ? अशी विचारणा टेक्निशियन करत आहेत. मोबाईल फोन सोबत असेल, तर मशिनच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या एक्सरेचा फोटो काढून घ्या आणि डॉक्टरांना दाखवा अशी सूचना मिळते. त्यामुळे 'एक्सरे काढायचा, स्मार्ट फोन मिळेल का? अशी विनवणी करणारे अनेक गरीब रुग्ण या विभागाबाहेर विनवणी करताना दिसतात.
मंगळवारी 'पुढारी'च्या प्रतिनिधीने अशाच एका गरजू रुग्णास मदत केली. स्मार्ट फोन नसल्याने तीन दिवसांपासून त्याचे एक्सरेसाठी खेटे सुरू होते. मोबाइलमध्ये एक्सरेचा फोटो आणला, तरी रुग्णांची फरफट संपत नाही. अनेकांना मोबाइलमध्ये एक्सरे स्पष्ट दिसत नाही, पुन्हा आणा असे उत्तर डॉक्टरांकडून मिळते. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी घाटीत तपासणीला येणाऱ्या पैठण तालुक्यातील एका दिव्यांग तरुणीची याच कारणामुळे तीन आठवड्यांपासून फरफट सुरू आहे.
एक्सरे फिल्मची ऑर्डर दिलेली
घाटी अधिष्ठातांनी रेडिओलॉजी विभागाचा आढावा घेतला. विभागात सध्या एक्सरे फिल्मचा तुटवडा आहे. संबंधित पुरवठादारांकडे एक्सरे फिल्मची ऑर्डर दिली असून, रुग्णांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊ.
-डॉ. विकास राठोड, प्रभारी वैद्यकीय अधिकारी