औरंगाबाद : मराठवाड्याच्या सिंचनासाठी निधीचा बूस्टर डोस देणार -मुख्यमंत्री शिंदे

औरंगाबाद : मराठवाड्याच्या सिंचनासाठी निधीचा बूस्टर डोस देणार -मुख्यमंत्री शिंदे
Published on
Updated on

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी (दि.17) मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत सुरू असलेल्या विकासकामांची उजळणी घेऊन सिंचन प्रकल्पांना निधीचा बूस्टर डोसही दिला. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे
पाणी मराठवाड्यात वळविणे, मध्य गोदावरी उपखोर्‍यात 44 प्रकल्पांना मान्यता, तसेच वैजापूर तालुक्यातील शनिदेव उच्चपातळी
बंधार्‍याच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

मराठवाडा वॉटरग्रीडमध्ये नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातील 4 धरणांचा समावेश करून बंद पाइपलाइनद्वारे शेतीला पाणी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. अमृत महोत्सवी मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते येथील सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण करण्यात आले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, आ. संजय शिरसाट, आ. नारायण कुचे, आ. उदयसिंग राजपूत आदींची उपस्थिती होती.

'हैदराबाद मुक्तिसंग्राम हे आपल्या इतिहासातील देदीप्यमान पर्व होते. आजच्या पिढीला या इतिहासाची माहिती देणे काळाची गरज आहे,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. मराठवाड्यासाठी शासन भरीव निधी देत असून, सीएम वॉर रूममधून विकासकामांचा नियमितपणे आढावा घेतला जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, 'अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी हैदराबाद मुक्ती लढ्यासाठी जिवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला, हौतात्म्यही पत्करले. मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जिवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाड्याची राणी
लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध दगडाबाई शेळके यांच्यासारख्या अनेक महिलांच्या योगदानाची आज आठवण होते. या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे मोल करणे शक्य नाही.' शिवसेनेमुळे मराठवाड्याशी निकटचा संबंध शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात सुरू झाल्यानंतर आपला मराठवाड्याशी निकटचा संबंध आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले

मुख्यमंत्र्यांच्या घोषणा

परभणी : शहरात पाणीपुरवठा व भुयारी गटार योजना, मल शुद्धीकरण केंद्रासाठी कृषी विद्यापीठाची जागा, स्त्री रुग्णालयासाठी निधी, वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा, छ. शिवाजी महाराज उद्यानाचे सुशोभीकरण, क्रीडा संकुलासाठी कृषी विद्यापीठाची
जमीन, गुप्तेश्वर मंदिरासाठी निधी, दिव्यांग पुनर्वसन केंद्र.

हिंगोली : औंढा नागनाथ मंदिर विकास, हळद संशोधन केंद्रासाठी जागा, श्रीसंत नामदेव मंदिर संस्थान
परिसराचा विकास, कुरुंदा येथे पूर प्रतिबंधक कामे.

नांदेड : क्रीडा संकुलासाठी जागा, घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी, बायोमायनिंग प्रक्रिया प्रकल्प, शहरात भुयारी गटार योजना.

बीड : जि.प., जिल्हाधिकारी कार्यालय व सा.बां. विभागाच्या प्रशासकीय इमारतीचे काम.

लातूर : सामान्य रुग्णालयासाठी जागा, विमानतळ भूसंपादनासाठी निधी, रस्ते दुरुस्ती व डांबरीकरणासाठी निधी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व नियोजन भवन इमारतीचे काम, वॉटरग्रीड मधून लातूर जिल्हा व शहरासाठी प्रकल्प, लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्हयातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील पाणी टंचाई निवारणासाठी उजनी येथून 112 द.ल.घ.मी. पाणी केंद्र शासनाच्या
मदतीने उपलब्ध करणे, तावरजा मध्यम प्रकल्पाची दुरुस्ती, महावितरणच्या भूमिगत केबल नेटवर्कचे काम, चाकूर येथे औद्योगिक
क्षेत्र स्थापन करण्यासाठी भूसंपादन.

उस्मानाबाद : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यान्वित करणे, तुळजाभवानी मंदिर व परिसराचा
विकास.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news