औरंगाबाद : मन्वर खुनानंतर घेऊन गेला अंकिताच्या अंगावरील दागिने

औरंगाबाद : मन्वर खुनानंतर घेऊन गेला अंकिताच्या अंगावरील दागिने
Published on
Updated on

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : लग्नाचा तगादा आणि अनैतिक संबंधांच्या संशयातून यू-ट्यूबर सौरभ बंडोपंत लाखे (31, रा. शिऊर, ता. वैजापूर) याने मित्र मन्वर उस्मान शहा याच्या मदतीने प्रेयसी अंकिता श्रीवास्तव (24) हिचा खून केला होता. तसेच, तिचे तुकडे करण्यात आले होते. ही क्रूरता कमी होती की काय म्हणून, त्यांचा आणखी संतापजनक प्रकार समोर आला आहे. तिचे तुकडे करण्यापूर्वी आरोपी मन्वरला सोन्याचा मोह आवरला नाही. त्याने अंकिताच्या अंगावरील सर्व दागिने काढून नेले होते. हे दागिने सोमवारी सिडको पोलिसांनी त्याच्या घरातून जप्त केले आहेत.

सौरभ लाखे आणि अंकिता श्रीवास्तव हे शिऊरला शेजारी राहायचे. शिऊर अंकिताचे सासर होते. लग्नानंतर अंकिताला एक मुलगी झाली. ती सतत आजारी असते, तरीही अंकिता सौरभच्या प्रेमात पडली आणि तिने पतीसह मुलीला सोडून औरंगाबादला राहणे पसंत केले. सौरभ आणि अंकिता यांच्या नेहमी भेटी व्हायच्या. सुरुवातीचे काही दिवस त्यांचे नाते चांगले राहिले. मात्र, अंकिताचे इतरांशी असलेले अनैतिक संबंध सौरभला समजू लागले होते. त्यामुळे तिच्याशी लग्न करण्याच्या तयारीत असलेला सौरभ नंतर नकार देऊ लागला. त्यातून त्यांच्यात खटके उडाले आणि यातूनच 15 ऑगस्टला सौरभ व मन्वर यांनी अंकिताचा गळा दाबून काटा काढला होता.

तुकडे करण्यापूर्वी दागिने काढले

15 ऑगस्टला खून केल्यावर 16 ऑगस्टला मन्वरने दिलेल्या सुऱ्याने सौरभने तिचे तीन तुकडे केले. दोन तुकडे तो घेऊन गेला. 17 ला तिचे धड घेऊन जाताना तो अडकला होता. या प्रकरणात सौरभ, मन्वर व धनेश्वर हे तिघे गजाआड आहेत. पोलिस कोठडीत असताना त्यांच्या चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली. अंकिताचे तुकडे करण्यापूर्वी मन्वरने तिच्या गळ्यातील सर्व दागिने काढून घेतले आणि ते स्वत:च्या घरी नेऊन ठेवले होते. पोलिस निरीक्षक संभाजी पवार, तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक विनोद सलगरकर, उपनिरीक्षक अशोक अवचार यांनी हे दागिने मन्वरच्या घरातून जप्त केले.

अंकिताच्या डायरीत आहे तरी काय?

हडको कॉर्नर भागातील ज्या खोलीत अंकिताचा खून केला, त्यात तिच्या दोन डायऱ्या सापडल्या आहेत. एका डायरीत तिने प्रेमाबाबत बरेच काही लिहून ठेवले आहे. आजारी मुलीबाबतही उल्लेख करताना पती व मुलीला सोडण्याची चूक केल्याबद्दल आई-वडिलांची माफी मागितली आहे. डायरीतील जवळपास 25 पाने तिने लिहिलेली आहेत. याशिवाय फॅशन डिझायनिंगचे काही स्केच काढलेले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news