औरंगाबाद : भारत विश्वगुरू नक्की होणार – डॉ. विजय भटकर

औरंगाबाद : भारत विश्वगुरू नक्की होणार – डॉ. विजय भटकर
Published on
Updated on

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा :  जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारताची जगातील तिसर्‍या क्रमांकाची आर्थिक महासत्ता म्हणून ओळख निर्माण झाली आहे. अमृतमहोत्सवी वर्षातील प्रगतीची घोडदौड कायम ठेवून शताब्दी वर्षात भारत विश्वगुरू नक्की बनेल, असा विश्वास नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला.

शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षांत समारंभ भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते पद्मविभूषण खा. शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना सन्माननीय डी.लिट. प्रदान करण्यात आली. उच्चशिक्षण क्षेत्रात नवीन शैक्षणिक धोरणानंतर मोठे फेरबदल होणार आहेत. ज्ञान हेच भांडवल असल्याचा प्रत्यय आपणा सर्वांना येणार असल्याचे डॉ. भटकर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शरद पवार व नितीन गडकरी यांना भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मानव्य विद्या शाखेतील डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ. आंबेडकर, यशवंतरावांचे मराठवाड्यासाठी योगदान : शरद पवार

डी.लिट. स्वीकारल्यानंतर शरद पवार म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे येऊन मिलिंदचा कॅम्पस उभा केला, हा मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचा भाग आहे. त्यावेळी शिक्षण एका मर्यादेच्या पुढे पोहोचत नव्हते. यावेळी मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी भावना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. हा विचार कृतीत आणणारे यशवंतराव चव्हाण या दोघांचेही विद्यापीठ पर्यायाने मराठवाडा या विभागासाठी मोठे योगदान आहे, असे उद्गार शरद पवार यांनी काढले. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात विद्यापीठाचा नामविस्तार केला. मराठवाड्याला आणखी एक विद्यापीठ दिले. या काळात मोठा संघर्ष करावा लागला. याची राजकीय किंमत काही प्रमाणात आपल्यालादेखील चुकवावी लागली, असे खा. शरद पवार म्हणाले.

विद्यापीठ नॉलेज पॉवर सेंटर : नितीन गडकरी

विद्यापीठ हे एकप्रकारचे नॉलेज पॉवर सेंटर आहे. त्यामुळे विद्यापीठाने प्रदेशानुसार संशोधन करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. मराठवाडा सुखी, समृद्ध आणि संपन्न होण्यामध्ये तसेच सामाजिक, आर्थिक संपन्न होण्यामध्येही विद्यापीठ आणि महाविद्यालयांची मोठी भूमिका आहे. त्या भागातील सामाजिक, आर्थिक परिवर्तन करीत आणि शिक्षणात गुणात्मक परिवर्तन होण्याकरिता काय केले पाहिजे, याचाही विद्यापीठांकडून विचार होणे आवश्यक असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

…शरद पवार झाले भावुक

ज्या मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर करण्यासाठी सत्तेवर पाणी सोडावे लागले, त्याच विद्यापीठाने डी.लिट. देऊन गौरव केल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अत्यंत भावुक झाले. या सोहळ्यात शरद पवार काही क्षण स्तब्ध झाले होते. खासकरून जेव्हा त्यांच्या योगदानाचा आढावा घेतला जात होता, तेव्हा शरद पवार भावुक झालेले पाहायला मिळाले.

डी.लिट.पेक्षाही मोठ्या पदाचे मानकरी : कोश्यारी

महाराष्ट्राचे विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे शरद पवार व नितीन गडकरी यांचे देशासाठीचे योगदान खूप मोठे आहे. डी.लिट.पेक्षाही एखादी मोठी पदवी असली, तर या दोघांना प्रदान केली असती, या शब्दांत भगतसिंह कोश्यारी यांनी दोघांचा गौरव केला. पवार यांचे शेतीसाठीचे मोठे योगदान आहे, तर गडकरी यांची खरी ओळख शेतकरी-व्हिजनरी-मिशनरी अशी आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news