

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : नशेखोरी शहराची पाठ सोडायला तयार नाही. अशाच एका नशेखोराने मंगळवारी सिडको चौकाजवळ भररस्त्यावर चांगलाच हैदोस घातला. दिसेल त्या वाटसरूंवर तो दगडाने हल्ला करीत सुटला. त्याच्या या दगडफेकीत तीन महिला, एका मुलासह रिक्षाचालकाला चांगलाच मार बसला. अखेर नागरिकांनी पाठलाग करुन या नशेखोराला जालना रोडवरील नाईक कॉलेजजवळ पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हा
थरार सिडको एन-1 चौक ते नाईक कॉलेज दरम्यान सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. या घटनेने शहरातील
वाढत्या नशेखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्यांपैकी वर्षा डोंगरे सिडको ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. राजू जाधव (रा. राजनगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. तो मजुरी करतो, असे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.
अधिक माहिती अशी की, सिडको कार्यालयाच्या समोर राजू जाधव नशेत तर्र होऊन फिरत होता. त्याने कशाची नशा केली होती, हेदेखील समजत नव्हते. तो रस्त्याने शिवीगाळ करीत फिरत होता. त्याने अचानक एका महिलेला मारहाण केली. जाधव तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने एन-1 चौकात वर्षा डोंगरे या महिलेलाही मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड मारला. त्या रक्तबंबाळ झाल्या. मद्यपी जाधव एन-1 चौकाकडून सिडको चौकाच्या दिशेने पळत आला. रस्त्याने जो दिसेल त्याला तो मारहाण करीत होता. महिला, मुले, अशा कोणालाच त्याने सोडले नाही. वसंतराव नाईक कॉलेजपर्यंत हा धिंगाणा सुरू होता. नागरिकांच्या दिशेने दगड भिरकावत त्याने दहशत निर्माण केली. या दरम्यान त्याने एक मुलगा, तीन महिलांना मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
नशेखोराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वर्षा डोंगरे यांची घाटीत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून नशेखोर राजू जाधव याच्याविरुद्ध सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती संभाजी पवार यांनी दिली. दरम्यान, आरोपीची वैद्यकीय तपासणी केली असून तो नशेत असल्याचे समोर आले आहे.
नशेखोर राजू जाधव रस्त्याने दिसेल त्याला दगड मारीत होता. तो पळत वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या
जवळ आला. तेथे पाठलाग करून नागरिक व तरुणांनी त्याला पकडले. नागरिकांनी आधी त्याला बेदम चोप
दिला. पब्लिक चोप बसल्यानंतर तो शांत झाला. दरम्यान, सिडको ठाण्यातील उपनिरीक्षक कैलास अन्नलदास यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांच्या ताब्यातून राजू जाधवची सुटका केली. घटनेची
स्थानिकांकडून माहिती घेतली. त्यानंतर जाधवला पोलिस ठाण्यात नेले.