

पाटोदा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बेलखंडी येथील अस्तित्व अनिल माने या अकरा वर्षीय चिमुकल्याने दाखवलेल्या सतर्कतेमुळे जंगलाला लागलेली आग वेळेत विझवण्यात यश आले. त्याच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत असून वनविभागाच्या वतीने नुकताच त्याचा सत्कार करण्यात आला.
पाटोदा तालुक्यातील बेलखंडी येथील जंगलाला आग लागली होती. ही आग अकरा वर्षीय अस्तित्व माने या
चिमुकल्याने पाहिली. या आगीत झाडे जळून जातील, पशू- पक्षी होरपळून मरतील म्हणत त्याने फोन करून तातडीने
वडिलांना माहिती दिली. अस्तीत्व याचे वडील अनिल माने यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकार्यांना माहिती
दिली. यानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आग विझवण्यासाठी धावून आले. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्यात यश मिळवले. अस्तित्व माने याने सतर्कता दाखवत आगीची माहिती वडिलांना दिली नसती तर वनविभागाला उशिरापर्यंत आगीची माहिती मिळाली नसती. यामुळे हजारो झाडे, पशू- पक्षी आणि वन्यजीव होरपळून गेले असते. परंतु वय कमी असतानाही सामाजिक भान जपत अस्तित्व माने याने आगीची माहिती वडिलांना दिली.
एवढ्या कमी वयात त्याने जपलेल्या सामाजिक भानामुळे झाडे, पशू- पक्षी आणि पर्यावरनाचे मोठे नुकसान टळले.
अस्तित्व माने हा सामाजिक कार्यकर्ते तथा बेलखंडी-कदमवाडी सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल माने पाटील यांचा मुलगा आहे. त्याने दाखवलेल्या सतर्कतेचे कौतुक होत असून बांबु दिनानिमित्त वनविभागाच्या वतीने त्याचा सत्कार
करण्यात आला. याप्रसंगी संत जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थानचे महंत भक्तीदास महाराज शिंदे वनविभागाचे काकडे, जगताप, शिंदे व कर्मचारी उपस्थित होते.
अलीकडच्या काळात पर्यावरण, निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी नागरिकांची संख्या वाढत आहे. विशेष करून शालेय विद्यार्थी पर्यावरणाचे रक्षण आणि वृक्ष लागवडीत आग्रेसर आहे. सरकारी कोट्यवधी वृक्ष लागवडीत प्रत्येकवर्षी तोच खड्डा अशी वास्तव परिस्थिती आहे. शाळा, महाविद्यालयाच्या माध्यमातून लावलेल्या झाडांचे सर्वधनही होत आहे. अवघ्या 11 वर्षे वयाचा अस्तित्व माने हा नव्या पिढीचा पर्यावरणप्रेमी आहे. खुप कमी वयात त्याला पर्यावरणाची गोडी असल्याचे या प्रकारातून स्पष्ट झाले आहे.
अवघे 11 वर्षे वय असलेल्या अस्तीत्व माने याने दाखवलेली सतर्कता प्रेरणादायी आहे. अशा कमी वयात सामाजिक
भान असलेल्या चिमुकल्याचा वनविभागाने लेखी प्रशस्तीपत्र देऊन उचीत सन्मान करण्याची गरज आहे. कारण यातून ईतरही शालेय पर्यावरण रक्षणाची प्रेरणा मिळेल. दरम्यान, अस्तित्व माने याचे जण आंदोलनाचे विश्वस्त
अँड. अजित देशमुख यांनी अभिनंदन केले.