औरंगाबाद : चाकूहल्ला करणार्‍याला कारखाली चिरडले

file photo
file photo
Published on
Updated on

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गुन्हेगारांच्या टोळक्याने सिडको भागात भरदिवसा धुमाकूळ घातला. एकाने कारच्या काचा फोडून जिवघेणा चाकूहल्ला केल्यानंतर दुसऱ्याने त्याला थेट कारखाली चिरडल्याचा प्रकार समोर आला. 19 ऑगस्टला भरदिवसा या दोन्ही घटना घडल्या. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल असून, दोनजण गंभीर जखमी आहेत. एकाला सिडको पोलिसांनी गजाआड केले आहे. शेख एजाज शेख इब्राहीम (33, रा. कैसर पार्क, नारेगाव), युनूस सिकंदर पटेल (50, रा. हर्सूल) असे जखमींचे नाव असून, ते दोघेही रेकॉर्डवरील आरोपी आहेत. आधी एजाजने युनूसवर चाकूहल्ला केला. त्यानंतर युनूसने त्याला कारखाली चिरडले. यात एजाजच्या तीन बरगड्या मोडल्या आहेत. पोलिसांनी युनूसचा साथीदार शेख आमेर ऊर्फ अम्मू शेख ईसाक (30, रा. फातेमानगर, हर्सूल) याला अटक केली होती.

पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले, की युनूस पटेल हा शेख आमेर ऊर्फ अम्मू शेख ईसाक आणि असदखान ईसाखान पठाण यांच्यातील वाद मिटविण्यासाठी कारने (एमएच 20, एफवाय 7861) हडको कॉर्नर भागात आला होता. तेथे कारमध्ये बसून ते आझाद चौकापर्यंत आले. दरम्यान, आमेर आणि असदखान यांच्यात समझोता झाला. ते एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले. तेवढ्यात एजाज शेख तेथे आला. त्याने युनूस पटेलवर कारच्या काचा फोडून हल्ला केला होता. या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

कॅनॉटमधून वादाला सुरुवात जखमी एजाजच्या फिर्यादीनुसार, तो नारेगावमध्ये जुने टायर उचलण्याचे काम करतो. 18 ऑगस्टला संध्याकाळी सात वाजता तो कॅनॉटमध्ये असताना युनूस पटेल हा लहान मुलीच्या खांद्यावर हात ठेवून उभा असल्याचे त्याला दिसले. एजाजने 'क्या भाऊ, अच्छा लगता क्या, बच्ची की उमर की लडकी के गले मे हात डालकर खडा है,' असे बोलून त्याला हटकले होते. तेव्हा युनूसने एजाजच्या कानाखाली मारली होती. दोस्त असल्याने एजाज त्याला काहीही बोलला नाही. तो तेथून निघून गेला होता.

युनूस म्हणाला, 'पोलिस ठाणे माझ्या मुठीत'19 ऑगस्टला युनूस पटेलने एजाज शेखला फोन केला आणि ओळख पटवून देत, 'सब चौकीयां मेरी मुठ्ठी में हैं. मैं कॅनॉट मे लडकियों में उठता-बैठता हूं. तुझे अच्छा नही लगता. तू बहोत बडा हो गया क्या?' असे बोलला. त्यावर एजाजने 'आप बडे भाई हो,' असे उत्तर दिले. तेव्हा युनूसने त्याला भेटण्यासाठी आझाद चौकात बोलावले. मात्र, हा युनूसचा डाव असावा, अशी शंका एजाजच्या मनात आली. त्यामुळे तो लगेच तेथे गेला नाही. युनूसने एजाजला पुन्हा फोन करून 'क्या लाला तू आया नही,' असे म्हणून बोलावून घेतलेच.

बंदुकीसारखे लायटर अन् चाकू

युनूसकडे जाताना एजाज तयारीने गेला. त्याने एका दुकानातून बंदुकीसारखे दिसणारे लायटर व नारळाच्या हातगाडीवरून चाकू सोबत नेला होता. आझाद चौकात युनूस कारमध्ये पाठीमागे बसलेला दिसला. तेव्हा शेख आमेर ऊर्फ अम्मू समोरच्या सीटवर बसलेला होता. एजाजने दगड उचलून कारच्या काचा फोडल्या आणि युनूसवर चाकूहल्ला केला. त्याला रुमान (रा. नारेगाव) व इम—ान लतिफ या दोघांनी बाजूला केले.

इम्रानसोबत जाताना उडविले

अ‍ॅड. एम. ए. लतिफचा मुलगा इम—ान हादेखील रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्यासोबत एजाज दुचाकीने तेथून निघून गेला, परंतु युनूस पटेल, आमेर शेख ऊर्फ अम्मू व अन्य एक अनोळखी या तिघांनी कारने त्यांचा पाठलाग केला. एन-5, भागातील सर्व्हिस रोडवर त्यांना गाठले. दुचाकीला पाठीमागून धडक दिली. एजाज व इम—ान रस्त्यावर कोसळले. तोच एजाजच्या अंगावरून कार घातली. त्याला चिरडून ते कारने पसार झाले.

आमेर ऊर्फ अम्मू गजाआड

या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे करीत आहेत. त्यांनी युनूस सिकंदर पटेलसोबत असलेला शेख आमेर ऊर्फ अम्मू शेख ईसाक याला या गुन्ह्यात अटक केली आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध तब्बल 25 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. सिडको पोलिसांनी त्याला साक्षीदार म्हणून बोलावले आणि अटक केली. याशिवाय युनूस पटेल, एजाज शेख, इम—ान लतिफ हे सर्वच रेकॉर्डवरील आरोपी आहेत. युनूसचा भाऊ फजल हा खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असून तो पॅरोलवर सुटल्यानंतर फरार होता. दोन दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेने घाटीत फजलला अटक केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news