औरंगाबाद : चंदन चोरांचा हैदोस सुरूच

औरंगाबाद : चंदन चोरांचा हैदोस सुरूच
Published on
Updated on

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : शहरात चंदन चोरांचा हैदोस आणि धाडस वाढत चालले आहे. दोन दिवसांपूर्वीच लष्कराच्या परिसरातून चंदनाचे झाड चोरी केल्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले यांच्या शासकीय निवासस्थानाच्या सुरक्षा रक्षकाच्या गळ्याला चाकू लावून चोरट्यांनी बंगला परिसरातील चंदनाचे झाड कापून नेले. शुक्रवारी (दि. 15) पहाटे तीन वाजता विद्यापीठ परिसरात ही घटना घडली. हे चंदन चोरटे वरिष्ठ अधिकार्‍यांची निवासस्थाने आणि सुरक्षा असलेल्या ठिकाणांहून चंदन चोर्‍या करीत एक प्रकारे पोलिस यंत्रणेला आव्हान देत आहेत.

पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी सांगितले, विद्यापीठ परिसरातच कुलगुरूंचे निवासस्थान आहे. दोन दरवाजेओलांडल्यानंतरच निवासस्थानात प्रवेश मिळतो. गुरुवारी रात्री या निवासस्थानाच्या मुख्य गेटवर दोन सुरक्षा रक्षक कर्तव्यावर होते. मध्यरात्रीनंतर शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दुचाकीवर चार चोरटे आले. त्यातील दोघांनी पहिल्या गेटवर तैनात सुरक्षा रक्षक संजय बिरदीलाल परदेशी (49, रा. पडेगाव) यांच्या गळ्याला चाकू लावून 'आवाज करू नको, एकदम शांत बस नाहीतर खतम करू', अशी धमकी देऊन त्यांना शांत केले. त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला. त्याचवेळी दुसर्‍या दोघांनी दोन क्रमांकाच्या मुख्य गेटच्या आतमधील सुरक्षा रक्षकाच्या केबिनमध्ये सुरक्षारक्षक कैलास नारळे यांनाही चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावला आणि सुरक्षा रक्षकांच्या केबिनच्या पाठीमागे असलेले चंदनाचे झाड कटर मशीनने तत्काळ कापले. चंदन असलेला खोडाचा भाग सोबत घेतला आणि फांद्या फेकून देत पोबारा केला. जाताना दोन्ही सुरक्षा रक्षकांचे मोबाईल घटनास्थळीच ठेवले.

दहा मिनिटांत आले पोलिस चोरटे गेल्यावर सुरक्षा रक्षकांनी तत्काळ आपापले मोबाइल उचलले. त्यातील एकाने लगेचच डायल 112 क्रमांकावर फोन लावून पोलिसांना घटनेची माहिती दिली. गांभीर्य ओळखून पोलिस तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. दहा मिनिटांत पोलिस आले, परंतु तोपर्यंत चोरांनी पोबारा केला होता. दरम्यान, घटनास्थळी उपायुक्त उज्ज्वला वनकर, पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी पाहणी केली.

एकच सीसीटीव्ही तोही बंद : औरंगाबाद शहर स्मार्ट बनले आहे. सेफ सिटी प्रकल्पांतर्गत शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसविले आहेत. उच्चभ्रू वस्तीत सीसीटीव्ही लावा, असे आवाहन यापूर्वी अनेकदा पोलिसांनीही केलेले आहे. शहरात सीसीटीव्हींची संख्या चांगलीच वाढली आहे. मात्र, कुलगुरूंच्या निवासस्थानी सीसीटीव्हींचा अभाव दिसून आला. निवासस्थान परिसरात तर एकही सीसीटीव्ही नसल्याचे समोर आले. तसेच, काही अंतरावर एक सीसीटीव्ही दिसला मात्र तोदेखील बंद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news