औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : बंडखोर चाळीस आमदारांपैकी दहा ते बारा आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते आम्हाला फोन करून त्यांची चूक कबूल करत आहेत. त्यामुळे हे आमदार शिवसेनेत परततील असा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतचे दोन आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर खैरे यांनी शिवसेनेतील कोणताही आमदार आता बाहेर जाणार नाही, उलट शिंदे गटातील आमदारच परतीच्या मार्गावर असल्याचा दावा केला आहे. खैरे म्हणाले, काही आमदारांनी बंडखोरी केली. परंतु आता त्यांना पश्चाताप होत आहे. त्यांना चूक लक्षात आली आहे. म्हणूनच ते आम्हाला फोन करून आमचे चुकले असे सांगत आहेत. दहा ते बारा आमदार शिवसेनेत पुन्हा परतणार आहेत. हे सरकार फार काळ चालणार नाही, असा दावाही खैरे यांनी केला.
भुमरे हे गावठी मंत्री
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्यावरही कठोर शब्दात टीका केली. संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत. ते काहीही बोलतात. त्यांच्या बोलण्याला मी फार महत्त्व देत नाही, असे खैरे म्हणाले.