एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावी ला पुण्यात बेड्या

एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावी ला पुण्यात बेड्या
Published on
Updated on

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : कॉर्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या आर्यन खान प्रकरणात एनसीबीकडून साक्षीदार करण्यात आल्याने प्रकाशझोतात आलेला आणि पुण्यासह अनेक शहरांत फसवणुकीच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या किरण गोसावी याला अखेर पुणे पोलिसांनी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात गुरुवारी अटक केली. गेल्या तीन वर्षांपासून किरण गोसावी पोलिसांना गुंगारा देत देशभर फिरत होता.

गोसावी याच्यावर पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात 2018 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. चिन्मय देशमुख यांनी ही फिर्याद दिली होती. फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी, अशी पोस्ट टाकून तीन लाख रुपये गोसावीने उकळले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला 2019 साली फरार घोषित केले होते.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) कडून प्रमुख साक्षीदार करण्यात आलेला किरण गोसावी गेल्या आठ दिवसांपासून फरार झाला होता. अवघे महाराष्ट्र पोलीैस दलच त्याच्या मागावर होते. त्याचे लोकेशन राज्याबाहेरचे दाखवत असल्याने व लोकेशन सारखे बदलत असल्याने त्याला पकडणे पोलिसांना अवघड जात होते. मोबाईल स्विच ऑन व स्विच ऑफ करीत किरण गोसावी देशातील अनेक भागांत फिरत होता. लोकेशन बदलत तो छुप्या मार्गाने पुण्यात आला आणि पुणे पोलिसांनी त्याला गुरुवारी पहाटेच्या सुमारास कात्रज येथील प्रसाद लॉजमध्ये अटक केली.

पोलिस आयुक्‍त अमिताभ गुप्ता, सहआयुक्‍त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्‍त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्‍त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक पोलिस निरीक्षक संदीप बुवा, अंमलदार संजय भापकर, चव्हाण यांनी ही कारवाई केली.

लूकआऊट नोटीस काढल्यापासून पुणे पोलिस किरण गोसावीच्या मागावर होते. तो उत्तर भारत, दक्षिण भारत अन् नंतर पुन्हा पुण्यात येईपर्यंत पोलिस त्याच्यावर नजर ठेवून होते. शेवटी त्याचा ठावठिकाणा मिळताच त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. फरासखाना पोलिस ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील फिर्यादी चिन्मय देशमुख याला गलिच्छ भाषेत शिवीगाळ केल्याची व धमकावल्याची माहितीही समोर येत आहे. त्याने संबंधित तक्रार दिल्यास त्या अनुषंगानेही आम्ही कारवाई करू. तसेच इतर कोणाची तक्रार असेल तर त्यांनीही समोर यावे, असे आवाहन पोलिस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

आठ दिवस पोलीस कोठडी

किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी दुपारी साडेचारच्या सुमारास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर. के. बाफना-भळगट यांच्या न्यायालयासमोर हजर केले. युक्‍तिवादात सरकारी वकील वर्षा असलेकर यांनी सांगितले की, गोसावी याला जॉब रॅकेटच्या गुन्ह्यात काही साथीदारांनी मदत केली असण्याची शक्यता आहे. त्याला न्यायालयाने एप्रिल 2019 मध्ये फरार घोषित केले आहे. फरार काळात गोसावी कुठे राहात होता, त्याला कोणी आश्रय दिला होता, याबाबत तपास करायचा आहे. त्यामुळे त्याला 10 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी. या युक्‍तिवादानंतर न्यायालयाने गोसावी याला आठ दिवसांची कोठडी सुनावली.

गोसावीला आणले पुणे पोलीस आयुक्‍तालयात

किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केल्याबरोबर त्याला कडेकोट पोलिस बंदोबस्तात पुणे पोलिस आयुक्‍तालयात आणण्यात आले. तेथे त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला सकाळी साडेअकराच्या सुमारास ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर त्याला दुपारच्या सत्रात न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

गोसावी अखेर पुण्यात सापडला!

क्रूझ ड्रग्ज पार्टीच्या हायप्रोफाईल प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी पत्रकारांना मुलाखती देत फिरत होता. तो त्याचा मोबाईल फोन मध्येच बंद ठेवायचा. त्यामुळे त्याचे लोकेशन पोलिसांना सापडत नव्हते. मुंबईतून तो फरार झाला. तो थेट उत्तर भारतातील लखनौ, फत्तेपूर सिक्री येथे गेला. तेव्हा पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र त्याचे लोकेशन सापडत नव्हते. तेथून तो हैदराबाद, मुंबई, पनवेलमार्गे पुण्यात कात्रजमध्ये आला आणि पुणे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

पंधरा दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता. महाराष्ट्र पोलिस, उत्तर भारतात त्याच्या मागावर गेले. लखनौ, फत्तेपूर सिक्री, हैदराबाद, जळगाव, चाळीसगाव, अंमळनेर, मुंबई, पनवेल, लोणावळा पुण्यातील पानशेत, नंतर रावेत आणि पहाटे कात्रज येथे त्याचे लोकेशन ट्रेस झाले. तेथील मांगडेवाडीतील प्रसाद लॉजवर पुणे पोलिसांनी अटक केली.

अन् गोसावी झाला सचिन पाटील…

पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो अतिशय धूर्त असून तो वारंवार मोबाईल व वेगवेगळे सिमकार्ड बदलत होता. याच दरम्यान तो आपली ओळख लपविण्यासाठी सचिन पाटील या नावाने वावरत होता. प्रसाद लॉजमध्ये गोसावी अर्धवट नावाने मुक्‍काम करत असल्याचा संशय बळावला.

आम्ही लॉज मालकाकडे चौकशी केली असता एकच माणूस आहे. परंतु, त्याच्याकडे आयडी कार्ड नाही. वॉलेट हरविल्याने मोबाईलवर आयडी प्रूफ मागवून देतो, असे सांगितल्याने आम्ही त्याला रूम दिली. पहाटे साडेतीन वाजता पोलिस मॅनेजरला घेऊन गोसावीच्या रूमवर गेले. मॅनेजरलाच दरवाजा नॉक करायला लावला. गोसावीने अर्धवट झोपेत असतानाच दरवाजा उघडला आणि पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news