

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
येत्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांची इन्सिडंट कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
येणार्या आषाढी वारीनिमित्त विविध पालख्यांचे प्रस्थान झाल्यापासून ते मुक्कामापर्यंत तसेच त्यांना नेमून दिलेल्या पालखीतळावरुन पालखी प्रस्थान होईपर्यंतच्या कालावधीसाठी सर्वस्वी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इन्सिडंट कमांडर म्हणून त्यांनी सर्व शासकीय आणि पोलिसयंत्रणेशी संवाद ठेऊन यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठीच्या सर्व गोष्टी पार पाडाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकार्यांनी केल्या आहेत.
दिलेल्या सूचनांनुसार विविध कामकाज पार पाडण्यसाठी विविध विभागांच्या नेमणुका करणे, त्यामध्ये नियोजन, कृती, सल्ला, नियंत्रण, गुप्तवार्ता, सुरक्षा यादृष्टीने विविध अधिकार्यांच्या नेमणुका करुन त्यांच्याकडून योग्य पध्दतीने काम करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, यंदा आषाढी यात्रा मोठ्या प्रमाणावर भरण्याची शक्यता आहे.कोरोनाचे निर्बंध कमी झाले असून, पाऊसकाळही उत्तम असल्यामुळे यात्रा मोठी भरेल, अशी शक्यता आहे.