आंतरराष्ट्रीय : भारतीयांचा युरोपात डंका

आंतरराष्ट्रीय : भारतीयांचा युरोपात डंका
  • अमोल पवार, कॅलिफोर्निया

युरोपातील आयर्लंड या देशाच्या पंतप्रधानपदी लिओ वराडकर या भारतीय वंशाच्या व्यक्तीची दुसर्‍यांदा नियुक्ती होणे, ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. कोरोना काळात वराडकर यांनी पंतप्रधानपदाच्या सत्तेची झूल खाली ठेवत डॉक्टरी वस्त्रे अंगावर चढवून केलेली रुग्णसेवा अनेकांच्या स्मरणात असेल. आज युरोप खंडातील तीन देशांमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्ती पंतप्रधान म्हणून विराजमान आहेत.

जगभरात भारतीयांचा डंका हा अलीकडील काळात जोमाने वाजत आहे. कधी शिक्षण क्षेत्रातील कामगिरीने, तर कधी आयटी क्षेत्रातील योगदानातून. जागतिक राजकारणातदेखील मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. काही महिन्यांपूर्वी बि—टनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनाक यांची झालेली निवड भारतीयांचा अभिमान वाढवणारी ठरली. त्यापाठोपाठ आता लिओ वराडकर हे आयर्लंड या युरोपियन देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा विराजमान झाले आहेत. मुंबईत राहणारे त्यांचे वडील अशोक हे 1973 मध्ये आयर्लंडला स्थलांतरित झालेे होते. आज त्यांच्या डॉक्टर मुलाने या देशाचा दुसर्‍यांदा पंतप्रधान बनण्याची किमया साकारली आहे. सातासमुद्रापारही भारतीय वंशाची हुकूमत वाढत चालल्याचे प्रतीक म्हणून याकडे पाहिल्यास गैर ठरणार नाही.

वयाच्या 22 व्या वर्षी राजकारणात पदार्पण करणारे लिओ 27 व्या वर्षी पहिल्यांदा संसदेत निवडून गेले. 2011 ते 2013 या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडामंत्रिपद भूषवले. लिओ हे आयर्लंडच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचे पंतप्रधान आहेत. आता त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू होत आहे. 2017 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी तेे पहिल्यांदा पंतप्रधान झालेे. समलैंगिकतेचा पुरस्कार करणारे तसेच स्वतःला समलैंगिक म्हणून जाहीर करणारे लिओ हे अत्यंत स्पष्ट वक्ते आणि परखड स्वभावाचे आहेत. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1979 रोजी आयर्लंडची राजधानी डब्लिन येथे झाला. त्यांची आई मरियम या मूळच्या आयर्लंडच्या. आयर्लंडमध्ये 1993 पर्यंत समलैंगिकता गुन्हा मानला जात होता. मात्र, 2013 मध्ये आयर्लंडमध्ये एक जनमत चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतर 2015 च्या मे महिन्यात या देशात समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यात आली. तत्पूर्वी, काही महिने अगोदर वराडकर यांनी खुलेपणाने समलैंगिक संबंधांची माहिती सार्वजनिक केली. त्यावेळी ते आरोग्यमंत्री होते.

विद्यार्थिदशेपासूनच त्यांना राजकारणात रूची होती. 2007 मध्ये डब्लिन पश्चिम येथून त्यांनी फाईन गेलच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते विजयी होऊन कौन्सिलर झाले. त्यावेळी ते केवळ 24 वर्षांचे होते. लिओ यांची आई मरियम या परिचारिका होत्या, तर वडील अशोक हे अनिवासी भारतीय डॉक्टर होते. 1960 च्या दशकात बि—टनच्या राष्ट्रीय आरोग्यसेवेमध्ये अशोक यांनी काम केले. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराड हे अशोक यांचे मूळ गाव. 2019 मध्ये लिओ वराडकर यांनी कोकणातील आपल्या गावी भेट दिली होती. लिओ यांचे प्राथमिक शिक्षण सेंट फ्रान्सिस नॅशनल स्कूलमध्ये झाले. पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी एक खासगी माध्यमिक शाळा किंग्ज हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेतला. 2003 मध्ये डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये वैद्यकीय पदवी घेतली आणि त्यानंतर प्रॅक्टिस सुरू केली.

आयर्लंडमध्ये 2020 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीनंतर वराडकर यांच्या फाईन गेल पक्षाने फिएना फेल आणि ग्रीन पार्टी या पक्षांशी युती करून सरकार स्थापन केले होते. आघाडीच्या अटींनुसार दोन पक्षांनी पंतप्रधानपद वाटून घेतले होते. त्यानुसार फिएना फेल पक्षाचे मीहॉल मार्टिन यांची 16 डिसेंबर 2022 पर्यंत पंतप्रधानपदी नियुक्ती झाली होती. त्यावेळी उपपंतप्रधानपद लिओ वराडकरांकडे होते. आता 17 डिसेंबर रोजी लिओ यांची पंतप्रधानपदी नेमणूक झाली. आयरिश गृहयुद्धामध्ये एकमेकांचे कडवे वैरी असणार्‍या या दोन पक्षांमधील हा समझोता आयर्लंडच्या इतिहासातील एक लक्षणीय घडामोड मानली जाते.

लिओ वराडकर हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा बि—टन 'ब—ेक्झिट' लागू करण्याची तयारी करत होता. आयर्लंड हा बि—टनबरोबर व्यापार करण्याबाबत चर्चा करत होता. यानुसार वराडकर यांच्या नेतृत्वाखाली आयर्लंडने बि—टनशी चर्चा केली. यात उभय देशांत सीमेपलीकडून ये-जा करणार्‍यांवर असलेले निर्बंध शिथिल होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 2020 मध्ये निवडणुका झाल्या आणि वराडकर हे देशाचे नवे उपपंतप्रधान झाले.

या काळात कोरोनाची लाट आली. साहजिकच, वराडकर यांच्यासमोर आव्हाने वाढली. देशात निर्बंध लागू करताना म्हटले की, 'वर्क फ्रॉम होम'ची पद्धत ही लवकरच सामान्य होईल. परंतु, कोरोना संकटाने आयर्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरला. या रोगाविषयीचे आकलन आणि उपाययोजनांची दिशा ठरवताना आरोग्य केंद्रीय घटकांचा समावेश यामध्ये लिओ वराडकर कमी पडले नाहीत. याचे कारण त्यांनी सात वर्षे डॉक्टर म्हणून काम केले आहे. राजकारणात येण्याआधी वराडकर डब्लिन येथील सेंट जेम्स रुग्णालय आणि कोनोली रुग्णालयात ज्युनिअर डॉक्टर म्हणून काम करत होते. मात्र, नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. वराडकर यांनी कोरोना काळात मार्च 2020 मध्ये पुन्हा एकदा आरोग्यसेवा सुरू केली. नागरिकांच्या आरोग्यावरील संकट आणि त्याद़ृष्टीने कमी असणारी डॉक्टरांची संख्या यांचा विचार करून त्यांनी आठवड्यातून एक दिवस लोकांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला.

यादरम्यान ते फोनवरून लोकांना आरोग्य सल्लेही देत होते. कोरोना काळातील त्यांचा हा पुढाकार जगभरात चर्चेचा विषय ठरला. एखाद्या देशाचा पंतप्रधान नागरिकांवर उपचारांसाठी राजकीय सत्तेचे जोडे आणि अंगवस्त्रे बाजूला ठेवून वैद्यकीय पोशाख परिधान करून रुग्णसेवेत उतरताना पाहून पायदळी तुडवल्या जाणार्‍या लोकशाही मूल्यांच्या काळातील जगभरातील तमाम संवेदनशील मनांना आशेचे किरण दिसले. कोरोनाचा काळ हा मोठा भीषण होता. एरव्ही एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या काळातील वैद्यकीय सेवा आणि कोरोना काळातील रुग्णसेवा-उपचार यामध्ये फरक होता. कारण, इथे जीवाची बाजी लावली जाणार होती. असंख्य प्रतिबंधात्मक काळजी घेऊनही काही डॉक्टर मृत्यू पडल्याची नोंद जगभरात नित्याने होत होती. परंतु, वराडकरांनी त्याची पर्वा केली नाही. असा सहृदयी भारतीय वंशाचा नेता आयर्लंडच्या पंतप्रधानपदी पुन्हा विराजमान झाला आहे. तिसरे जग म्हणून भारतीयांना सतत हिणवणार्‍या युरोपियन जनतेसाठी ही बाब विचार करायला लावणारी आहे. कारण, आज युरोप खंडातील ब्रिटन, आयर्लंड व पोर्तुगाल या तीन देशांमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्ती पंतप्रधान म्हणून विराजमान आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news