औरंगाबाद : पोलिस आयुक्तालयात जाळून घेतलेल्या महिलेचा मृत्यू; १४ तासांनंतर मृत्यूशी झुंज संपली

औरंगाबाद : पोलिस आयुक्तालयात जाळून घेतलेल्या महिलेचा मृत्यू; १४ तासांनंतर मृत्यूशी झुंज संपली

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शेजारील महिला आणि तिचे कुटूंब त्रास देतात आणि यांना माझा पतीही यांना सामिल असल्याचे आरोप केला होता. आता जगणं असहाय्य झालंय, अशी चिठ्ठी लिहित सविता दीपक काळे (३४, रा. मांडवा, ता. गंगापूर) या महिलेने गुरुवारी दुपारी पोलिस आयुक्तालयातच पेटवून घेतले. ६० टक्के भाजलेल्या सवितावर घाटीत उपचार सुरू होते. परंतु १४ तासांनंतर तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर थांबली आहे. शुक्रवारी पहाटे ४ वाजता तिचा मृत्यू झाला, अशी माहिती बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.

याप्रकरणी सविताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास होकार दर्शवला आहे. शेजारची महिला त्रास देते. तिचे ऐकून पती मारहाण करतात. याची तक्रार सदर मृत महिलेने पोलिस ठाण्यात केली होती. पण वाळूज ठाण्यातील पोलिसांनी याची योग्य अशी दखल घेतली नाही. यानंतर जीवनात असहाय्य त्रास होतोय, असे म्हणत सविताने पोलिस आयुक्तालयाच्या पायऱ्यांवरच अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले होते.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी सविता यांचा २००२ मध्ये दीपक काळे यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. दीपक खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करतो. त्यांच्यात मागील दहा वर्षांपासून सतत वाद होत होते. या वादात दीपक अनेकवेळा सविता यांना मारहाण करत. तसेच, ज्या महिलेवर संशय आहे, तिच्यासह तिचा पती, मुलगा हेदेखील सविता यांना त्रास देत. ते या ना त्या कारणावरून सविता यांच्याशी वाद घालणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे असे प्रकार मागील अनेक दिवसांपासून करत होते. त्यांना पती दीपक हेदेखील साथ देत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

सदर मृत महिलेने याप्रकरणी वाळूज ठाण्यात अनेकदा तक्रारीही दिल्या आहेत. त्यावरून पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. तसेच, सविता यांच्या भावाला त्या महिलेने चाकू मारला होता, याबाबतही वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल आहे. २४ ऑगस्ट रोजीही सविता यांना शेजाऱ्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. त्यावरून वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

पोलिसांकडून तक्रारींकडे दुर्लक्ष

सविता काळे यांच्यासह त्यांच्या भावाने वाळूज ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारींकडे वाळूज पोलिसांनी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले, असा आरोप मृत सविता यांनी करतच हे पाऊल उचलले होते. यानंतर आता तिच्या नातेवाइकांनीही असा आरोप करत पोलीसांच्या कर्तव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आतापर्यंत दाखल केलेल्या तक्रारींवरून ठोस अशी कारवाई न केल्यामुळे आरोपींचे मनोबल वाढले. त्यामुळे ते सविता यांना सतत त्रास देत गेले. असे नातेवाइकांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news