आज आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच आषाढ शुद्ध दशमीला ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय, सोपानकाका अशा बहुतेक पालख्या पंढरपुरात प्रवेश करतात. संत मुक्ताबाई, संत निळोबाराय अशा काही पालख्या आधीच पंढरपुरात पोहोचलेल्या असतात. त्यापूर्वी आषाढ शुद्ध नवमीला ज्ञानेश्वर माउली, तुकोबाराय, सोपानकाका यांच्या पालख्या वाखरी मुक्कामी येतात. वाखरी हे गाव पंढरपूरच्या पूर्वेस 8 किमी अंतरावर आहे.
वाखरीला पोहोचण्यापूर्वी आषाढ शुद्ध नवमीला बाजीराव विहीर येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उभे व गोल अशी दोन रिंगण होतात. याच ठिकाणी तुकोबांच्या पालखीचे आणि सोपानकाकांच्या पालखीचेही रिंगण होते. ही विहीर दुसरे बाजीराव पेशवे यांनी बांधली असल्याने या विहिरीला बाजीराव विहीर असे म्हणतात. हे रिंगण बघायला पंढरपुरातून अनेक लोक येतात.
संत नामदेवराय हे पंढरपूरचे रहिवासी. विठोबाचे लडिवाळ भक्त. संतांच्या द़ृष्टीने बघितले, तर नामदेवराय म्हणजे पंढरपूरचे प्रतिनिधी. नामदेवरायांची कर्मभूमी आणि समाधीस्थान पंढरपूरच असल्यामुळे समाधीस्थानावरून त्यांची पालखी आषाढी वारीसाठी निघत नाही; मात्र पंढरपूरला आलेल्या सर्व संतांच्या स्वागतासाठी नामदेवरायांची पालखी दशमीला वाखरीला सर्व संतांना सामोरी जाते. याशिवाय कार्तिक महिन्यामध्ये आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळ्यासाठीसुद्धा नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरवरून आळंदीला जाते.
दशमीला पंढरपुरातून संत नामदेवरायांची पालखी सर्व संतमेळ्याच्या स्वागतासाठी निघते तेव्हा बरोबर पंढरपुरात आधी पोहोचलेली संत मुक्ताबाईंची पालखीसुद्धा असते. अफाट गर्दीमुळे नामदेवरायांची पालखी माऊलींच्या पालखीपाशी वाखरी येथे जाणे शक्य नसते. पंढरपुरातून निघालेला हा पालखी सोहळा वाखरी आणि पंढरपूर यामध्ये असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी पादुका मंदिरापाशी येतो. या ठिकाणी काही वेळ भजन, भारूड होते.
ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे चोपदार येऊन स्वागतासाठी आलेल्या नामदेवरायांच्या पालखीला पंढरपूरकडे चलण्याची विनंती करतात. त्यानंतर हा पालखी सोहळा पुन्हा पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. पालखी सोहळे पादुकांपाशी आल्यावर त्या त्या पालख्यांचे या ठिकाणी उभे रिंगण होते. हे सोहळ्यातील शेवटचे रिंगण असते. पालख्यांचा पंढरपूर प्रवेशाचा क्रम ठरलेला असतो. दशमीपासून चतुर्दशीपर्यंत पाच दिवस पालख्यांचा मुक्काम पंढरपुरात असतो.पौर्णिमेला गोपाळपूर येथे काला झाला की, पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो.
अभय जगताप