औरंगाबाद
औरंगाबाद

औरंगाबाद: वेरूळ, अजिंठ्यासह इतर पर्यटनस्थळे बहरली ; एका आठवड्यात 81 हजारांहून अधिक पर्यटक

औरंगाबाद, पुढारी ऑनलाइन : कोरोनाची बंधने शिथिल झाल्यानंतर यावर्षी दिवाळीच्या सुट्‌टीत मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 21 ते 27 ऑक्टोबर या सात दिवसांच्या कालावधीत तब्बल 81 हजार 647 देश -विदेशांतील पर्यटकांनी पर्यटन स्थळी भेटी दिल्या. त्यात सर्वाधिक पसंती ही वेरूळ आणि बिबीका मकबऱ्याला देण्यात आली.

दिवाळीमुळे अनेक जण नातेवाइकांकडे येतात. तसेच काहीजण आपल्या कुटुंबाबरोबर खासकरून पर्यटन स्थळे पाहण्यासाठी भेटी देतात. यावर्षीदेखील मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. त्यामुळे वेरूळ, अजिंठा लेणी, बिबीका मकबरा, दौलताबाद किल्ला, औरंगाबाद लेणी ही पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली. दिवाळीच्या सुटीमध्ये देश- विदेशांतील पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. त्यात देश आणि विदेशांतून वेरूळ, अजिंठा लेणी, बिबीका मकबरा, दौलताबाद किल्ला, औरंगाबाद लेणी येथे 21 ते 27 ऑक्टोबर दरम्यान 91 हजार 647 पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. त्यात 81 हजार 140 देशभरातून तर 507 विदेशांतून आलेल्या पर्यटकांचा समावेश आहे.

वेरूळ लेणीचे आकर्षण 

या सात दिवसांत वेरूळ लेणी येथे देशी 27 हजार 435 तर विदेशी 196, बिबी का मकबरा या ठिकाणी 26 हजार 19 देशी तर 84 विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. तसेच अजिंठा लेणीला 11 हजार 688 देशी 157 विदेशी, दौलताबाद किल्ला येथे 13 हजार 639 देशी 58 विदेशी पर्यटक आले. तसेच औरंगाबाद लेणी या ठिकाणी सात दिवसांत 2 हजार 371 देशी 12 विदेशी अशा पर्यटकांनी भेटी देल्या आहेत. सर्वांत जास्त वेरूळ लेणी पाहण्याकडे पर्यटकांचा कल दिसून आला.

logo
Pudhari News
pudhari.news