

बडोदा : गुजरातमध्ये बडोद्याच्या गायकवाड राजघराण्याचे 'लक्ष्मीविलास पॅलेस' हे सुंदर व भव्य निवासस्थान आहे. हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठे खासगी निवासस्थान असल्याची प्रसिद्धी आहे. इंग्लंडच्या राजघराण्याच्या बकिंघम पॅलेसपेक्षा ते आकाराने चौपट मोठे आहे. सयाजीराव गायकवाड यांच्यासारख्या अत्यंत आदरणीय अशा राजामुळे गायकवाड घराणे ओळखले जाते. आजही या घराण्याला तिथे अतिशय मानसन्मान मिळतो. सध्या या घराण्याचे कर्ते पुरुष आहेत महाराजा समरजितसिंह गायकवाड. त्यांच्या पत्नीचे नाव आहे राधिकाराजे गायकवाड. त्याच आज या सर्वात मोठ्या घराच्या गृहिणी आहेत.
राधिकाराजे यांचा जन्म 19 जुलै 1978 रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. एम. के. रणजितसिंह झाला यांनी आपली शाही बिरुदे बाजूला ठेवून 'आयएएस' अधिकारी बनण्याचा मार्ग निवडला होता. राधिकाराजे आज ज्या घराच्या गृहिणी आहेत, ते घर 3 कोटी 4 लाख 92 हजार चौरस फूट जागेत व्यापलेले आहे. इंग्लंडचे बकिंघम पॅलेस 8 लाख 28 हजार 821 चौरस फूट जागेत आहे. सध्या जगातील सर्वात महागडे घर म्हणून मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील 'अँटिलिया' या घराची प्रसिद्धी आहे. त्याची किंमत 15 हजार कोटी रुपये आहे. या घराने 48,780 चौरस फुटांची जागा व्यापली आहे. लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये 170 खोल्या आहेत.
हा राजवाडा महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी सन 1890 मध्ये बांधला. त्यावेळी त्यासाठी एक लाख 80 हजारांचा खर्च आला होता. या राजवाड्याच्या परिसरात एक गोल्फ मैदानही आहे. राधिकाराजे यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून भारताचा इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. 2002 मध्ये त्यांचा महाराजा समरजितसिंह गायकवाड यांच्याशी विवाह झाला. तत्पूर्वी त्या पत्रकार म्हणून काम करीत होत्या हे विशेष! 2012 मध्ये लक्ष्मीविलास पॅलेसमध्येच समरजितसिंह गायकवाड यांनी पारंपरिक पद्धतीने राज्याभिषेक केला.