Aaditya Thackeray : शिंदे-फडणवीस सरकार गुत्तेदारी व टक्केवारीवाल्यांच्या हिताचे; आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray : शिंदे-फडणवीस सरकार गुत्तेदारी व टक्केवारीवाल्यांच्या हिताचे; आदित्य ठाकरे

Published on

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : ज्यांनी घडवलं, ज्यांनी उभं केलं त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून आणि गद्दारी करून सत्तेत आलेले शिंदे फडणवीस यांचे सरकार शेतकरी हिताचे नसून गुत्तेदारी आणि टक्केवारी हिताचे सरकार आहे. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची विश्वासघात केला ते सर्वसामान्यांशी विश्वासाने कसे वागतील? त्यामुळे येणाऱ्या काळात सामान्यांचा ही जोपासणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहा, असे सडेतोड प्रतिपादन करून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले.

शिवसंवाद अभियानांतर्गत गेवराई तालुक्यातील रुई येथे बुधवारी (दि 8) सायंकाळी झालेल्या मेळाव्यात, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेतकरी संवाद साधला. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना मराठवाडा संपर्क नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, संभाजीनगर संपर्कप्रमुख घोसाळकर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, माजी आ सुनील धांडे, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, शिवसेना जिल्हा समन्वयक युधाजित पंडित, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे, युवा नेते रोहित पंडित, युवा सेना जिल्हाप्रमुख सागर बहिर, महिला सेना जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण आदींसह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री बदामराव पंडित म्हणाले की, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे. परंतु त्यांच्याशी धोका करण्यात आला. हे राज्यातल्या जनतेला पटले नाही. म्हणून सत्तांतरानंतर राज्यात शिवसेनेची मोठी लाट आली असून, येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या काळात टीव्ही, वर्तमानपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने कुटुंबप्रमुखाची भूमिका बजावत आपल्याशी संवाद साधला. कोरोना विषयीची खरी माहिती दिली. प्रत्येकाच्या जीवाची काळजी घेतली. रुग्णांना उपचार मिळेल यासाठी प्रयत्न केले. त्यांनी केलेल्या कार्याची न्यायालयाने दखल घेतली. त्यासोबतच जागतिक आरोग्य संघटनेनेही दखल घेऊन त्यांचे कौतुक केले. त्यावेळी झालेल्या दोन्ही वर्षाच्या सर्वेमध्ये उद्धव ठाकरे हे पहिल्या तीन नंबर मध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून गणले गेले आहेत. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, लॉकडाऊननंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल की नाही? अशी शंका होती. परंतु ते झाले आणि उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती दिली. त्याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला. त्यासोबतच 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली. परंतु त्यांच्यासोबत चाळीस गद्दारांनी गद्दारी केली आणि सरकार पाडले. ते स्वतः सत्तेत आले, मात्र अजूनही शेतकऱ्यांना 50 हजाराची मदत मिळाली नाही. पिक विमा मिळाला नाही. नुकसान भरपाई मिळाली नाही. कारण, हे सरकार शेतकरी हिताचे नसून गुत्तेदारी आणि टक्केवारी घेणाऱ्यांच्या हिताचे आहे. जे लोक सत्तेत येण्यासाठी गुजरातला गेले, त्यांच्याच काळात वेदांत सारखे लाखो कोटी रुपयांचे अनेक प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेले. यामुळे महाराष्ट्रातील युवकांना रोजगार मिळत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. अशी स्थिती असेल तर या गद्दारांच्या पाठीशी तुम्ही उभा राहाल का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

पुढे त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना एक आव्हान देखील दिले आहे. ते म्हणाले की, तुम्ही एवढे लोकप्रिय असाल तर द्या राजीनामा, मीही देतो राजीनामा आणि लढा माझ्या वरळी मतदारसंघातून पाहू जनता कोणाला स्वीकारते? जर याची भीतीच वाटत असेल तर तुमच्या ठाण्यातून आपण दोघेही लढू, पाहू जनता कोणाच्या पाठीशी आहे, असे थेट आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देऊन आदित्य ठाकरे यांनी येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचे आवाहन उपस्थित हजारो शेतकऱ्यांना केले. यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांना प्रतिसाद दिला.

या शेतकरी संवाद मेळाव्यास तालुकाप्रमुख कालिदास नवले, युवासेना तालुकाप्रमुख गोविंद दाभाडे, माजी तालुकाप्रमुख विनायक मुळे, माजी सभापती पंढरीनाथ लगड, उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, उपतालुकाप्रमुख दिनकर शिंदे यांच्यासह गेवराई तालुक्यातील आणि पंचक्रोशीतील हजारो युवकांसह महिला, पुरुष शेतकरी उत्साहाने उपस्थित होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news