

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : आरटीओच्या भरारी पथकाने जप्त केलेल्या वाहनांकडे वाहन मालक फिरकत नसल्याने दिवसेंदिवस जप्त वाहनांची संख्या वाढत आहे. अनेक दिवस एकाच जागेवर वाहन थांबून असल्याने अनेक वाहने भंगार अवस्थेत आहेत. अशा वाहनांचा आरटीओ कार्यालयाला विळखा पडला असून कार्यालयात जाण्यासाठी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
आरटीओ कार्यालयातील भरारी पथके टॅक्स चुकवणे, अपघात, पीयूसी व बनावट कागदपत्रे आदी प्रकरणी वाहनांवर कारवाई करतात. अनेकदा वाहनधारक दंड भरून वाहने सोडवून नेतात. तर दंडाची रक्कम जास्त आणि वाहनांच्या सध्याच्या अवस्थेत असणारे बाजार मूल्य कमी असलेल्या वाहनांकडे वाहनधारक दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशी वाहने अनेक वर्षांपासून आरटीओ कार्यालयाच्या आवारात तशीच उभी आहेत.
वर्षानुवर्षे एकाच जागेवर उभी असल्याने यातील अनेक वाहनांची झीज झाली आहे. तर अनेक वाहनांची चाके, स्टेअरिंग, बॅटऱ्या, टप व इतर साहित्य गायब आहेत. आरटीओ प्रशासनाच्या वतीने या वाहनांच्या मालकांना दंड भरून वाहन सोडवून नेण्यासाठी वारंवार सांगण्यात आले आहे, परंतु, अद्याप वाहनधारक फिरकलेच नसल्याने वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर एकाच जागेवर वाहने उभे असल्याने त्यांची अवस्थाही बिकट झाली आहे.
दरम्यान नियमित वेळेत वाहन सोडवून न नेल्यास न्यायालयाच्या परवानगीने या वाहनांचा लिलाव करण्यात येतो. यापूर्वी दोन ते तीन वेळा लिलाव करून सुस्थितीतील वाहने लिलावात काढली होती. अद्यापही अनेक वाहने आरटीओ कार्यालयात उभी आहेत. नियमित वेळेपेक्षा जास्त दिवस झाल्याने या वाहनांचाही लिलाव न्यायालयाची मान्यता मिळताच करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचलंत का?