पुढारी ऑनलाईन डेस्क : लाेकमान्य टिळक स्वातंत्र्यचळवळीतील एक अग्रनेते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना करणाऱ्या टिळकांची 'भारतीय असंताेषाचे जनक' अशीही ओळख आहे. एका इंग्रज पत्रकार व लेखकाने टिळकांना दूषण म्हणून दिलेली ही उपाधी पुढे त्यांची भूषण ठरली. जाणून घेवूया, लाेकमान्य टिळकांना हे भूषण कसे मिळाले….
हिंदूस्थानात अशांतता दिसत आहे, त्याचे कारण शोध, असे सांगून ब्रिटीश सरकारने व्हॅलेंटाईन चिरोल याला हिंदूस्थानात पाठविण्यात आले होते. वर्ष हाेते १९१०. भारतात आल्यानंतर चिरोल याने केवळ टिळकांच्या विरोधकांचीच भेट घेतली. टिळक हे भारतातल्या अशांततेला कारणीभूत कसे आहेत, हे त्याने आपल्या लेखमालेत लिहिले. १९१५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'इंडियन अनरेस्ट' या पुस्तकात बदनामीकारक मजकूर छापल्याबद्दल टिळकांनी लंडनच्या कोर्टात अब्रूनुकसानीची फिर्याद दिली हाेती. या खटल्याचा निकाल १९१९ मध्ये टिळकांच्या विरुद्ध लागला. टिळकांना 'भारतीय असंतोषाचे जनक' ही दूषण म्हणून दिलेली उपाधी या खटल्यानंतर त्यांची भूषण ठरली. या खटल्याचा सविस्तर तपशील अरविंद व्यं. गोखले यांच्या 'टिळकपर्व' या पुस्तकात दिला आहे.
चिरोल याने सहा वेगवेगळ्या प्रकारांनी आपली बदनामी केल्याचे लोकमान्य टिळकांनी म्हटले होते. स्वराज्यासाठी बाल दरोडेखोरांच्या टोळ्या उभ्या करण्याची कल्पना टिळकांनी सर्वप्रथम पुढे आणली. जनतेत आपल्या ताकदीचे प्रदर्शन मांडण्यासाठी त्यांनी स्वत: व्यायामशाळा उघडल्याचा आरोप चिरोलने केला होता; पण टिळकांनी कधीही गोरक्षणाची चळवळ उभी केलेली नव्हती किंवा मुस्लिमांची मने भडकवण्यासाठी गोरक्षण संस्था किंवा संघटना चालवलेली नव्हती. पैलवानकीचे आखाडे सुरू करून तालमींना बळ दिलेले नव्हते. पण चिरोल याने आपल्या लेखात निराधार माहिती दिली हाेती. .
ताई महाराज प्रकरणी उच्च न्यायालयाने १९१० मध्ये दिलेल्या निकालाची चिरोलने मोडतोड करून त्यात टिळकांवर अतिशय घृणास्पद आणि हीन दर्जाचे आरोप केले. त्यातही अतिशय गंभीर आरोप म्हणजे पुण्यात २२ जून १८९७ मध्ये चापेकर बंधूंनी रँड आणि आयर्स्ट यांच्या केलेल्या खुनांमध्ये टिळकांचाच हात होता, तसेच नाशिकमध्ये २१ डिसेंबर १९०९ रोजी अनंत लक्ष्मण कान्हेरे या १७ वर्षांच्या तरुणाने 'संगीत शारदा' पहायला आलेले जिल्हा न्यायाधीश ऑर्थर मॅसन टिपेट्स जॅक्सन यांचा खून केला. त्या खूनांचाही संबंध चिरोलने टिळकांशी जोडला हाेता.
१९१४ मध्ये मंडालेहून पुण्यात परतल्यावर लोकमान्य टिळकांना चिरोलबद्दल समजले. त्यांनी आपले विकृत चित्र रंगवणाऱ्या चिरोलवर खटला भरला, या खटल्याची सुनावणी लंडनमध्ये २९ जानेवारी १९१९ रोजी सुरू झाली. हा खटला न्यायमूर्ती डार्लिंग आणि खास ज्यूरी यांच्यासमोर सुनावणीला घेण्यात आला. त्याआधी १३ नोव्हेंबर १९१८ रोजी टिळकांनी ब्रिटीश पंतप्रधान लॉईड जॉर्ज यांना पत्र लिहिले. चिरोलच्या खटल्यात सर जॉन सायमन आणि इ.एफ.स्पेन्स हे टिळकांचे वकील होते. ते मेसर्स डाऊनर अँड जॉन्सन या सॉलिसिटर कंपनिकडून नेमले गेले होते. या खटल्यात आपल्याला जिंकायचेच आहे, अशा जिद्दीने टिळकांच्या प्रयत्नांची शिकस्त चालली होती.
न्यायमूर्ती डार्लिंग आणि ज्यूरी यांच्यासमोर २९ जानेवारी १९१९ ते २१ फेब्रुवारी १९१९ असे सुमारे ११ दिवस खटला चालला. त्यानंतर ज्यूरीतील फोरमने प्रतिवादीच्या म्हणजे चिरोलच्या बाजूने निकाल दिला. लोकमान्य टिळकांच्या वकिलांनी दाखल केलेला अर्ज डार्लिंग यांनी फेटाळून लावला. टिळक हा खटला हरले. एकंदर दोन्ही पक्षांचा मिळून खर्च तीन लाख रुपये झाला आणि तो अर्थातच टिळकांवर पडला. टिळकांनी ही फिर्याद जरी स्वत: दाखल केली असली जनतेने त्यासाठी निधी गोळा केला हाेता. अशा सवालजवाबांनी गाजलेल्या या खटल्याचा निकाल मात्र टिळकांच्या जिव्हारी लागली. ब्रिटिश न्यायदानपध्दतीबद्दल त्यांच्या मनात आशा होती; पण तीच न्यायमूर्ती डार्लिंग यांनी धुळीला मिळवली. मात्र या खटल्यानंतर टिळकांची नवी ओळख 'भारतीय असंताेषाचे जनक' अशी झाली.