गंगापूर; (औरंगाबाद) : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद-पुणे महामार्गावर एसटी बसने ऊस तोडणी मजुरांच्या बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये बैलगाडीतील मायलेक जागीच ठार झाले. तर पतीसह दुसरा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात बैलगाडीचा चुराडा झाला असून, एक बैल जागीच ठार झाला, दुसरा जखमी झाला आहे. ही दुर्घटना ढोरेगाव – दहेगाव शिव रस्त्यालगत लोखंडी पुलावर आज (दि. २९) सकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मानिकपुंज ( ता.नांदगाव जि. नाशिक ) येथील ऊस ड कामगार गोविंद विठ्ठल गिरे, बाळू गोविंद गिरे, सोन्याबाई गोविंद गिरे व अर्जुन गोविंद गिरे हे ऊस तोडणीसाठी पहाटे दहेगाव शिवारामध्ये जात होते. बैलगाडी ईसारवाडी फाट्याजवळील इंडियन ढाबापासून महामार्ग ओलांडत होती. या वेळी पाठीमागून आलेल्या गंगापूर डेपोची बसने ( क्रमांक एम एच १४ बि टी २५०० ) बैलगाडीला जोराची धडक दिली.
या धडकेमध्ये बैलगाडी मध्ये बसलेले चौघेजणे दूरवर फेकले गेले. कलीयाबाई गोविंद गिरे (वय ४०), अर्जुन गोविंद गिरे (वय १०), रा.मानिकपुंद ता.नांदगाव जिल्हा नाशिक हे दोघे मायलेक जागीच ठार झाले, पती गोविंद विठ्ठल गिरे (वय ४५), मुलगा बाळू गोविंद गिरे (वय १५) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी गंगापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या धडकेत बैलगाडीचा चुराडा झाला. दोन बैलांपैकी एक बैल जागीच ठार झाला. गिरे कुटुंबीयांनी सकाळी तयार करून घेतलेले भाजी, भाकरी हे जेवणाचे साहित्याचे डबे, प्लेट, भाकरी, भाजीसह ऊस तोडीसाठी असलेले कोयते सगळे रस्त्यावर दूरवर जाऊन पडले होते.
हेही वाचा :