पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला भ्रष्टाचार मुद्यावर लक्ष्य केले पाहिजे आणि सनातन धर्म वादविवाद टाळला पाहिजे, असा सल्ला द्रमुकचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला आहे.
एमके स्टॅलिन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सनातन धर्माचे रक्षण करण्याचे विधान केले आहे. हा एक स्पष्ट संकेत आहे की ते या मुदयावर राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
सनातनला चर्चेचा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न एक केंद्रीय मंत्री दररोज प्रयत्न करत आहे. भाजपला भ्रष्टाचारावरील वादविवादाकडे दुर्लक्ष करुन सनातन धर्मावर लक्ष केंद्रित करून देशासमोर प्रमुख समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
कलंकित, जातीयवादी आणि निरंकुश भाजप राजवटीला पराभूत करून देश आणि लोकशाहीचे रक्षण करण्याचे आमचे ध्येय साध्य करण्यासाठी समर्पणाने काम करूया आणि मी सर्वांना आवाहन करतो की, मुख्य समस्यांकडे दुर्लक्ष होईल, असे विधान करु नका. भाजपचे लोक खऱ्या मुद्द्यांना विसरून लक्ष वळवण्यात पटाईत आहेत, असेही त्यांनी निवदेनात नमूद केले आहे.