मॉस्को / कीव्ह; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन (Russia Ukraine war) युद्धाच्या 15 व्या दिवशी गुरुवारी तुर्की येथील एंटाल्या शहरात झालेली रशिया-युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा अपयशी ठरली. रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह म्हणाले की, या चर्चेत आम्ही कुठल्याही निष्कर्षाप्रत पोहोचलो नाही. शस्त्रसंधीवर तर चर्चाही झाली नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना वाटत असेल तर आमचे राष्ट्राध्यक्ष पुतीन त्यांना भेटण्यास तयार आहेत. आज असो वा उद्या, चर्चा तर करावीच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, युक्रेनचे (Russia Ukraine war) राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, मारियुपोल येथील रुग्णालयावर रशियाने हल्ला केला असून अनेक नागरिक, बालके ढिगार्याखाली दबले गेले आहेत. या अत्याचाराकडे जगातील देश कधीपर्यंत दुर्लक्ष करतील. युक्रेनवर तत्काळ नो फ्लाय झोन घोषित करावा. हत्या बंद कराव्यात. तुमच्याकडे ताकद आहे. पण आम्हाला वाटते, आम्ही माणुसकी गमावत चाललो आहोत. मारियुपोलमध्ये आत्तापर्यंत 1,170 नागरिक मारले गेले आहेत. सामूहिक स्मशानात त्यांचे दफन केले गेले आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी नाटो देशांना आश्वस्त करताना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे संकट आले तर अमेरिका कुठलीही किंमत मोजून त्यांचे रक्षण करेल, असे म्हटले आहे. आमच्या कुठल्याही सहकार्यावरील हल्ला हा अमेरिकेवरील हल्ला मानला जाईल. आम्ही किमान 5 हजार सैनिक आणि पॅट्रियट क्षेपणास्त्रे पोलंडमध्ये तैनात केली आहेत. तर फूड प्रोग्रामसाठी 50 लाख डॉलर दिले आहेत, असे हॅरिस म्हणाल्या. (Russia Ukraine war)
रसायनास्त्रांच्या हल्ल्याची शक्यता (Russia Ukraine war)
अमेरिेकने रशियन फौजा रसायनास्त्रांचा वापर करू शकतात, असा इशारा दिला आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेन साकी यांनी सांगितले की, जैविक शस्त्रे, प्रयोगशाळा आणि युक्रेनमधील रसायनास्त्र विकासाबाबत रशियाचे दावे पोकळ आहेत. भविष्यातील रसायनास्त्रांच्या हल्ल्यांसाठी पार्श्वभूमी तयार करण्याचे काम याद्वारे रशिया करत आहे.