

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : निवडणुका पार पाडताना आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी. उमेदवारांनी मतदाराला पैशाचे अथवा दारूचे आमिष देऊ नये, कोणत्याही मतदाराला धाक अथवा धमकावून जबरदस्तीने मतदान करण्यापासून परावृत्त करणे कायद्याने गुन्हा आहे. निवडणुकीत कोणी कायदा हातात घेतल्यास त्याची गय केली जाणार नाही, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी केले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चव्हाण बोलत होते. पाथर्डी तालुक्यात होणार्या अकरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाथर्डी पोलिसांनी निवडणूक होणार्या गावांना भेटी देऊन आदर्श निवडणुका पार पाडाव्यात, यासाठी उमेदवार, कार्यकर्ते व ग्रामस्थांची जनजागृती करून, त्यांना कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत.
तालुक्यातील कोल्हार, तिसगाव, कोरडगाव व भालगाव या संवेदनशील गावातून पोलिसांनी संचलन करून शक्तीप्रदर्शन केले. पोलिसांनी स्थानिक पातळीवरील गावगुंडांची माहिती जमा केली असून, त्यांच्यावर विशेष लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हार, तिसगाव, कोरडगाव व भालगाव या संवेदनशील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र अधिकारी दिवसभर मतदानावेळी असणार आहेत. या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्तही दिला जाणार आहे. पोलिस, होमगार्ड यांच्या मदतीने अकरा गावांत प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील, रामेश्वर कायंदे, कौशल्यरामनिरंजन वाघ, उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, सचिन लिमकर हे अधिकारी कायदा सुव्यवस्था पाहणार आहेत.