नाशिक : वेगवेगळ्या घटनांत तीन बिबट्यांचा मृत्यू

नाशिक : वाहनाच्या धडकेत मृत झालेला बिबट्या.
नाशिक : वाहनाच्या धडकेत मृत झालेला बिबट्या.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन बिबटे ठार झाले आहेत. पैकी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बछड्याचा मृत्यू झाला. दुसर्‍या घटनेत मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला, तर महिनाभरापासून उपचार घेणार्‍या बिबट्याचाही उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवार आणि शनिवारी (दि. 15) घडलेल्या या तिन्ही घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, बिबट्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाचा शोध वनखात्याने सुरू केला आहे.

शुक्रवारी (दि. 14) रात्री 8 ते 8.30 च्या सुमारास विल्होळीजवळील राजूर बहुला येथील मुंबई आग्रा- महामार्गावरून पाच ते सहा वर्षांचा नर बिबट्या रस्ता ओलांडत होता. त्याला भरधाव वाहनाची धडक बसल्याने अंतर्गत रक्तस्राव होऊन बिबट्या ठार झाला. ही माहिती वनखात्याला कळविण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे व रेस्क्यू पथकाने पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेत कार्यवाही केली. बिबट्याच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, वनखात्याने संशयित चालकाचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, त्र्यंबक रोडवरील बेळगाव ढगा येथे बिबट्यांच्या झुंजीत चार महिन्यांची बिबट मादी ठार झाली. येथील तानाजी मोंडे यांच्या जागेत दोन बिबट्यांमध्ये ही झुंज झाली. गंभीर जखमेमुळे ही मादी मरण पावली. वनखात्याने मृतदेहाचा पंचनामा केला असता, तिच्या गळ्यावर मोठ्या बिबट्याने चावा घेतल्याचे दिसून आले. तर एक महिन्यापासून उपचार सुरू असलेल्या दीड वर्षीय बिबट मादीचाही शनिवारी (दि.15) मृत्यू झाला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news