नाशिक : जनावरे चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपचार न केल्याने रेबीज, हायड्रोफोबिया

नाशिक : जनावरे चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपचार न केल्याने रेबीज, हायड्रोफोबिया
Published on
Updated on

नाशिक : गौरव अहिरे
पिसाळलेले जनावर चावल्याने त्याच्या लाळेमार्फत रेबीजची लागण झालेल्या 10 जणांचा शेवट डार्करूममध्ये गेल्या तीन वर्षांत झाला. प्रतिबंधात्मक उपचार न केल्याने रेबीज, हायड्रोफोबिया होऊन रुग्णांचा हृदयद्रावक मृत्यू होतो. रेबीज, हायड्रोफोबियाची लागण झालेल्या रुग्णाला अंधार्‍या खोलीत (डार्करूम) ठेवले जाते व तेथेच त्याचा मृत्यू होतो. त्यानुसार जानेवारी 2020 ते डिसेंबर 2022 या कालावधीत जिल्हा रुग्णालयात 10 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

शहरीकरणासोबत अनेक प्रश्न वाढतात. त्यात पाळीव व मोकाट जनावरांचा प्रश्नही गंभीर आहे. त्यापैकी काही जनावरे पिसाळलेली असल्यास त्यांचा सर्वाधिक धोका नागरिकांना असतो. ही जनावरे नागरिकांना चावल्यास व संबंधितांनी वेळीच उपचार न घेतल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास त्यांना रेबीज होण्याचा धोका असतो. रेबीजची लागण झाल्यास त्यावर उपचार नसल्याने मृत्यू जवळपास निश्चित होतो. त्यामुळे श्वान, मांजर किंवा इतर प्राणी चावल्यानंतर नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता, प्राथमिक उपचार करून तातडीने रुग्णालयात जाऊन उपचार घेणे अत्यावश्यक आहे. जनावरांनी चावा घेतल्यानंतर रुग्णांनी वेळीच उपचार न घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला.

वर्षनिहाय श्वानदंशावरील लसीकरण आणि मृत्यू
वर्ष              उपचार घेतलेले रुग्ण                मृत्यू
2020                  778                                01
2021                  916                                02
2022                 1,687                              07

पाळीव किंवा मोकाट प्राणी चावल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू करावेत. त्यात ज्या प्राण्याने चावा घेतला, त्यावर लक्ष ठेवता येते का, जखमेच्या तीव्रतेनुसार रेबीज होऊ नये, यासाठी इंजेक्शन द्यावे लागतात. त्यामुळे प्राण्याने चावा घेतल्यानंतर त्वरित उपचार घ्यावेत. -डॉ. अशोक थोरात, शल्यचिकित्सक, जिल्हा शासकीय रुग्णालय.

रेबीजची लक्षणे
ताप आणि अंगदुखी होते.
विषाणू चेतासंस्थेत शिरल्यानंतर मेंदू आणि मणक्यात सूज येते.
फ्युरिअस रेबीजमध्ये रुग्णाचे वागणे बदलते. रुग्ण तापट होतो किंवा त्यांना पाण्याची भीती (हायड्रोफोबिया) वाटते.
हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू होतो.
पॅरेलॅटिक रेबीजमध्ये स्नायू हळूहळू कमकुवत होतात. रुग्ण कोमात जातो आणि त्यानंतर मृत्यू होतो.

खबरदारी कोणती घ्यावी
प्राणी चावल्यावर जखमेवरील प्राण्याची लाळ लवकरात लवकर स्वच्छ करावी. पाणी आणि साबणाने जखमेचा भाग 15 मिनिटे स्वच्छ धुवावा. जखम धुतल्यानंतर त्यावर अ‍ॅन्टिसेप्टिक लावावे. साबण किंवा विषाणूविरोधी औषध उपलब्ध नसेल, तर जखम पाण्याने धुवावी. रुग्णास मानसिक आधार द्यावा. रेबीज होण्याआधी उपचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत.

या चुका करू नयेत
साध्या हातांनी जखमेला स्पर्श करू नये, स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ करावेत. जखमेवर माती, तेल, लिंबू, खडू, मिरची पावडर असे पदार्थ लावू नये. जखमेवर पट्टी बांधू नये. जनावराने चावल्यास किंवा ओरखडा पडल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news