नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या ८२ शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पाचे ऑनलाइन उद्घाटन शनिवारी (दि. १०) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. या प्रकल्पांतर्गत मनपा शाळांमधील ६५६ वर्गखोल्या डिजिटल क्लासरूममध्ये परावर्तित करण्यात आल्या असून, प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक कक्षाचे रूपांतर नियंत्रण कक्षात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ६९ शाळांमध्ये संगणकीय प्रयोगशाळा विकसित करण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत ८८ प्राथमिक व १२ माध्यमिक अशा एकूण १०० शाळा चालविल्या जातात. या शाळांमधून २९ हजार ८५२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या ८२ शाळांमधील ६५६ वर्गखोल्यांमध्ये डिजिटल कन्टेन्ट, इंटरनेट व स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन सॉफ्टवेअर, लॅन कनेक्टिव्हिटीयुक्त ७५ इंची डिजिटल फळा उभारण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे या शाळांमध्ये ग्रीन बोर्ड आणि सॉफ्ट पिन बोर्ड, विद्यार्थी बॅच, शिक्षक टेबल, शिक्षक खुर्ची, डस्टबिन, एलईडी ट्यूब लाइट्स, छतावरील पंखे पुरविण्यात आले असून रंगकाम आणि किरकोळ दुरुस्तीची कामेदेखील करण्यात आली आहे. संबंधित मक्तेदाराच्या माध्यमातून पाच वर्षे मुदतीकरिता या प्रकल्पाची देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. ८ फेब्रुवारी २०२३ पासून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते. या कामासाठी सहा महिन्यांची मुदत होती. काम सुरू होऊन आता वर्ष उलटले आहे.
काठे गल्ली भागातील अटलबिहारी वाजपेयी शाळा प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट स्कूलमध्ये परावर्तित करण्यात आली. त्यानंतर सर्वच शाळांमध्ये एकाच वेळी या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली गेली. सर्वच ६९ शाळांमधील संगणक कक्ष व मुख्याध्यापक कक्षाचे काम पूर्ण झाले असून, शालेय वर्गात डिजिटल पॅनल बसविण्यात आले आहेत. सर्व शाळांना क्लाउड आधारित शाळा प्रशासन सॉफ्टवेअर, २०० एमबीपीएसच्या किमान गतीसह ब्रॉडबॅण्ड इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरविण्यात आलेली असून, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
असा आहे स्मार्ट स्कूल प्रकल्प
• मनपाच्या ८२ शाळांमध्ये प्रकल्पांची अंमलबजावणी.
• ६५६ वर्गखोल्या डिजिटल क्लासरूममध्ये परावर्तित
• ६९ शाळांमध्ये संगणक कक्ष स्थापन
• प्रत्येक संगणक कक्षात २० संगणक, सव्र्व्हर, प्रिंटर आणि लॅन कनेक्टिव्हिटी
• प्रत्येक शाळेसाठी मुख्याध्यापकांच्या दालनात नियंत्रण कक्ष
• प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ८०० शिक्षकांना प्रशिक्षण