नाशिक : जिल्ह्यातील २३१ गावे होणार ‘पाणीदार’

नाशिक : जिल्ह्यातील २३१ गावे होणार ‘पाणीदार’
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मृद व जलसंधारण विभागाकडून 'जलयुक्त शिवार अभियान २.०' राबविण्यात येत असून, त्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील २३१ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांच्या शिवारात अर्थात शेतात पडणारे पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये जिरविण्यासह जमिनीवर वर्षभर साठवून ठेवण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे निवड झालेली गावे पाणीदार होणार आहेत.

जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यामुळे नदी-नाल्यांमध्ये पाणी जास्तीत जास्त दिवस साचून राहण्यासह विहिरींना बारमाही पाणी उपलब्ध झाले होते. त्या अंतर्गत गावाच्या पाणलोट क्षेत्रावर जल व मृद् संधारणाची कामे करण्यात आली होती. आता जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आदर्श गावसह इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामधील पूर्ण झालेली आणि कार्यान्वित गावे वगळून उर्वरित गावांपैकी पाणलोट कार्यक्रम अंमलबजावणीसाठी विविध मुद्द्यांच्या आधारे गावांची निवड करण्यात आली आहे. केंद्र व राज्य पुरस्कृत मृद् आणि जलसंधारण-कृषी विभागाच्या योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, जिल्हा नियोजन व विकास समिती निधी, जिल्हा परिषद, सीएसआर निधी, सार्वजनिक खासगी भागीदारी, लोकसहभाग आदी स्रोतांमधून निधी उभारला जाणार आहे. या अभिसरणातून निधी उपलब्ध न झाल्यास जलयुक्तच्या लेखाशीर्षातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 'जलयुक्त शिवार अभियान २.०' च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात सुरुवातीला ३३७ गावांची निवड करण्यात आली होती. मात्र, विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यासाठी २१० गावांचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यानंतर शासनाकडील उपलब्ध निधीचा विचार करून ३३७ पैकी २३१ गावे चालू वर्षासाठी निवडून उर्वरित गावांना पुढील वर्षामध्ये निवडण्याचे आदेश अध्यक्षांनी समितीला दिले होते. त्यानुसार २३१ गावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आता या गावांमध्ये शिवार फेऱ्या घेऊन आराखडे तयार केली जाणार आहेत.

तालुकानिहाय गावांची संख्या
मालेगाव – २०, नांदगाव – १२, चांदवड – २१, येवला – १६, देवळा – १४, निफाड – १६, सिन्नर – १५, दिंडोरी – १४, नाशिक – ११, पेठ – १५, सटाणा – १७, कळवण – १५, सुरगाणा – १५, इगतपुरी – १५, त्र्यंबकेश्वर – १५.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news