सावकारी अन् लाचखोरीवर तक्रारींमुळेच राहील अंकुश

सावकारी अन् लाचखोरीवर तक्रारींमुळेच राहील अंकुश

Published on

नाशिक (एक शून्य शून्य) : गौरव अहिरे 

कित्येक पटीने चक्रवाढदराने व्याज वसूल करूनही मुद्दल 'जैसे थे'च ठेवणारे खासगी सावकार अन् शासनाकडून भरमसाट पगार घेऊनही दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी नागरिकांकडून लाच घेणारे लाचखोर लोकसेवक हे तराजूच्या दोन्ही काट्यांना समतोल ठेवतील एवढे वजनदार झाले आहेत. त्यास कारण म्हणजे दोघांविरोधात तक्रार देणारे कमी असून, दोघांवर अंकुश ठेवणार्‍या यंत्रणा तक्रारदारांच्या प्रतीक्षेत असतात. त्यामुळे तक्रारदार नाही, कारवाई करणारे नाही, कारवाई झाली तरी काही होत नाही या अविर्भावात खासगी सावकार व लाचखोर अधिकारी, कर्मचारी त्यांचा स्वभाव बदलत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे.

शहरात खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून दाम्पत्यासह, पिता व त्याच्या दोन मुलांनी तसेच इतरांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहिल्याने संबंधित सावकारांविरोधात गुन्हे दाखल करून पोलिसांनी कारवाई केली आहे. या घटनांनी खासगी सावकारांचा त्रास किती भयावह असतो याचे वास्तव सर्वांसमोर आले. मात्र, आर्थिक गरज भागवण्यासाठी अनेकजण नाईलाजास्तव आजही खासगी सावकारांवरच विसंबून असल्याचे दिसते. मात्र, गेल्या काही प्रकरणांमध्ये खासगी सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, विनयभंग, खंडणी, मारहाण, अपहरणासारखे गुन्हे दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे जानेवारी महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळ्यांमध्ये लाचखोर अधिकारी व कर्मचार्‍यांना पकडून 15 गुन्हे दाखल केले. महिनाभरात 15 कारवाया हा सर्वोच्च आकडा असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला आहे. या सर्वांमध्ये एकच साम्य असून तक्रारदार समोर आल्यानंतरच संबंधित खासगी सावकार किंवा लाचखोरांवर कारवाई झाली आहे. त्यामुळे कोणी तक्रार केली तरच कारवाई होते हे सत्य लाचखोर व खासगी सावकारांना माहिती असून, ते तशी खबरदारी घेत त्यांचा हेतू साध्य करत आहे. मात्र तक्रारदारांना तक्रारीचे सामर्थ्य कळत नसल्याने ते अन्याय सहन करत आर्थिक पिळवणुकीत आयुष्यभराची जमापुंजी किंवा जीव गमावत आहेत. हे टाळण्यासाठी तसेच अवाच्या सव्वा व्याजदराने कर्जदारांची आर्थिक पिळवणूक करणारे खासगी सावकार व लाचखोर अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर अंकुश आणण्यासाठी नागरिकांनी संबंधित यंत्रणांकडे तक्रार करणे आवश्यक आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news