यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत गळा दाबून खून करणाऱ्या पतीस पुसद येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. सुनील वाघोजी बोखारे (रा. बांसी) असे आरोपीचे नाव आहे.
६ ऑगस्ट २०१७ च्या रात्री आरोपीने पत्नी मनीषाचा खून करून पसार झाला होता. शवविच्छेदनात मनीषाचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत मनीषाच्या भावाने पुसद ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली होती. सुनील हा मनीषाच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. यातूनच त्याने तिचा खून केल्याचे तक्रारीत नमूद केली होते. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे यांनी प्रकरणाचा तपास करित होते. साक्षीदारांचे साक्ष नोंदवून न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे १२ साक्षदारांची साक्ष नोंदविण्यात आली.
यामध्ये मनीषाचा भाऊ प्रशांत दरोडे, आजोबा रामाजी गोडचे, डॉ. उमेश मडावी, डॉ. जयकुमार नाईक तसेच पंच साक्षदार रवि शिंगणकर, प्रेमेन्द्र चौधरी, शेख सद्दाम, गजानन राठोड आदींची साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षातर्फे सादर केलेले पुरावे आणि सरकारी वकील अॅड. महेश निर्मल यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सुनील वाघोजी बोखारे याच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच दंड न भरल्यास सहा महिने साधी शिक्षा सुनावली. या प्रकरणामध्ये शासनाची बाजू सरकारी वकील अॅड. महेश निर्मल यांनी मांडली. तर, पुसद ग्रामीण पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस कॉन्स्टेबल राहुल मार्कंडे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
हेही वाचा