नाशिक : दीपिका वाघ
शहराची परंपरा असलेली वसंत व्याख्यानमाला शतकमहोत्सवी आधुनिक तंत्रज्ञानानाने हायटेक होत असून, यंदा व्याख्यानमालेत होणारी व्याख्याने श्रोत्यांना लाइव्ह ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी व्याख्यानमालेची वेबसाइट, यू-ट्यूब चॅनल, फेसबुक व इन्स्टाग्राम पेजदेखील तयार करण्यात आले आहे. 400 हून अधिक व्हिडिओ, वक्त्यांचे फोटो, मनोगत तसेच 15 वर्षांपूर्वींची उपलब्ध असलेली वक्त्यांची भाषणे अपलोड करण्यात आली आहेत.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे नाशिकमध्ये कार्यरत असताना 1905 साली मे महिन्यात त्यांनी वसंत व्याख्यानमालेला सुरुवात केली. 1908 पर्यंत व्याख्यानमाला सुरळीत सुरू होती पण पुढे न्यायमूर्ती रानडे यांची बदली झाल्यानंतर व्याख्यानमाला बंद पडली. शंकराचार्यांनी त्यांचे शिष्य रावसाहेब वझे यांना वसंत व्याख्यानमाला नव्याने सुरू करण्याची सूचना केल्यानंतर 1 मे 1922 मध्ये व्याख्यानमालेला पुन्हा सुरुवात झाली. पहिले पुष्प डॉ. शंकराचार्य कुर्तकोटी यांनी गुंफले तेव्हापासून सुरू झालेली परंपरा आजतागायत नियमित सुरू आहे. सुरुवातीच्या काळात व्याख्यानासाठी येणारे श्रोते जमिनीवर सतरंजी टाकून बसायचे. सुरुवातीला साहित्यिक, आध्यात्मिक विषयांवर व्याख्यान घेतली जात होती. गोदाघाटावर घेतली जाणारी व्याख्याने ऐकण्यासाठी बाहेरगावाहून श्रोते मे महिन्यात नाशिकला खास मुक्कामी यायचे. नदीकिनारी भरणारी आणि महिनाभर सुरू असणारी व्याख्यानमाला ही नाशिकची ओळख आहे. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणारे श्रोते, विषय आणि वक्त्यानुसार श्रोत्यांच्या संख्येत वाढ होत असते. सर्वाधिक श्रोते लाभणारीदेखील ही एकमेव व्याख्यानमाला म्हणून देशभरात ओळखली जाते. व्याख्यानमालेला महानगरपालिकेचे अनुदान मिळते. तसेच व्याख्यानासाठी येणारे श्रोतेदेखील योगदान देतात, त्यामुळे ही व्याख्यानमाला अखंडपणे सुरू आहे. वसंत व्याख्यानमालेचे 2014 पासून कार्यालय सुरू झाले आहे. श्रीकांत बेणी अध्यक्ष, विलास ठाकूर, विजय हाके उपाध्यक्ष, चंद्रशेखर शहा कार्याध्यक्ष आहेत.
व्याख्यानमालेला येऊन गेलेले वक्ते
महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजगोपालाचारी, लता मंगेशकर, वि. वा. शिरवाडकर, वि. स. खांडेकर, धोंडो केशव कर्वे, वसंतदादा पाटील, शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी, आचार्य प्र. के. अत्रे, आचार्य विनोबा भावे, बॅ. अब्दुल रहमान अंतुले, जयप्रकाश नारायण, यशवंतराव पाटील, शांता शेळके, सुधीर फडके, राकेश शर्मा, डॉ. श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, किशोरी आमोणकर, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, लालकृष्ण अडवानी, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, एन. चंद्रा, गो. रा. खैरनार आदी.