औरंगाबाद; सुनील कच्छवे : मागील काही महिन्यांत महाराष्ट्रातील अनेक नियोजित उद्योग गुजरात राज्यात गेले. त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. आता औरंगाबादेतील दोन वाघही गुजरातला जात आहेत. अहमदाबादच्या कमला नेहरू प्राणिसंग्रहालयाला दोन वाघ देण्याच्या आणि त्यांच्याकडून कोल्हा, इमू यासह इतर काही प्राणी स्वीकारण्याच्या प्रस्तावाला औरंगाबाद महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार येत्या पंधरा दिवसांत प्राण्यांचे हे हस्तांतरण होणार आहे.
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात तीनशेहून अधिक प्राणी आहेत. यात सर्वाधिक १४ वाघ आहेत. बहुतेक प्राण्यांच्या जोड्या आहेत. परंतु सायाळ, स्पूनबिल पक्षी, इमू आणि कोल्हा हे प्राणी मात्र एकेकच आहेत. त्यांना जोडीदार नाहीत. त्यामुळे त्यांना जोडीदार मिळविण्यासाठी महापालिकेचे प्रशासन प्रयत्नशील होते. त्या अनुशंगाने देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. गुजरात मधील अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयाने हे प्राणी देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु त्याबदल्यात त्यांनी दोन पिवळे मादी वाघ देण्याची अट टाकली होती. दोन्ही ठिकाणच्या प्राणिसंग्रहालय प्रशासनात त्याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव ७ जुलै २०२२ रोजी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला. त्याला प्राधिकरणाने ७ जुलै ऑक्टोबर २०२२ रोजी मान्यता दिली. त्यानंतर प्राणिसंग्रहालय प्रशासनाने प्राण्यांचे प्रत्यक्ष हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे सादर केला होता. त्याला चौधरी यांनी नुकतीच मंजुरी दिली.
गेल्या काही वर्षांत औरंगाबाद हे वाघ पुरवठादार शहर बनले आहे. औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयात सध्या १४ वाघ आहेत. तर आतापर्यंत येथून देशभरातील विविध संग्रहालयांना सुमारे २६ वाघ देण्यात आले आहेत. वाघांच्या जन्मदरासाठी औरंगाबाद प्राणिसंग्रहालय चांगले ठिकाण ठरत आहे.. मागील काही वर्षांत येथे तीसहून अधिक वाघ जन्मले आहेत. त्यामुळेच देशभरातील प्राणिसंग्रहालयाकडून अधूनमधून औरंगाबादकडे वाघांची मागणी होत असते.
दोन मादी वाघांच्या बदल्यात अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयातून औरंगाबाद काही प्राणी मिळणार आहेत. यामध्ये तीन कोल्हे, दहा सायाळ, २ इमू आणि ६ स्पून बिल पक्षी यांचा समावेश आहे.
अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयातून कोल्हा, सायाळ, स्पून बिल आणि इमू हे प्राणी आणण्यास आणि आपल्याकडील दोन पिवळे मादी वाघ त्यांना देण्यास केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने आधीच मान्यता दिलेली आहे. त्यानुसार प्राण्यांच्या
हस्तांतरणाचा प्रस्ताव आम्ही प्रशासकांकडे सादर केला होता. त्यास प्रशासकांची मंजुरी मिळाली आहे. आता चालू महिन्यात प्राण्यांचे हस्तांतरण करण्याचा प्रयत्न आहे. – राहुल सूर्यवंशी, उपायुक्त, महापालिका.