गुरुवार २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३-३४ वाजेपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असेपर्यंत लाडक्या गौराईचे आपल्या घरी आगमन होणार आहे. शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन आहे. शनिवार २३ सप्टेंबर रोजी दुपारी २- ५५ वाजेपर्यंत चंद्र मूळ नक्षत्रात असेपर्यंत गौराई आपल्या लाडक्या गणपती बाप्पाबरोबर आपला निरोप घेणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की २३ सप्टेंबर रोजी दुपारी २-५५ पर्यंत चंद्र मूळ नक्षत्रात आहे. तोपर्यंत विसर्जनाच्या अक्षता गौरीला अर्पण करून विसर्जन करायचे, नंतर गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनाबरोबर प्रत्यक्ष विसर्जन करावयाचे गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनाचा आणि मूळ नक्षत्राचा काहीही संबंध नाही. गौराईचे स्वागत, उत्सव आपण आपल्या परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो. (Gauri Puja festival)
भाद्रपद शुक्लपक्षात चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असतांना गौरीचे पूजन करतात म्हणून ही 'ज्येष्ठा गौरी' म्हणून ओळखली जाते. गौरी म्हणजे हिमालयाची कन्या, भगवान शंकराची पत्नी गणपतीची माता 'पार्वती' होय. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतात नवीन धान्य तयार होते म्हणून गौरी 'धान्य लक्ष्मीच्या रूपात घरात प्रवेश करते. म्हणून या सणाला प्राचीन कालापासून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सासरी गेलेली मुलगी गौरीच्या सणासाठी माहेरी येत असते. गौराई माझी लाडाची गं !' असे म्हणत आई आपल्या मुलीचे कौतुकाने स्वागत करीत असते. गौरी पूजनाच्या दिवशी तिला तिच्या आवडीचे पदार्थ जेऊ खाऊ घालीत असते. गौरीचा सण थाटामाटाने साजरा करीत असतांना प्रत्येक स्त्री त्या गौरीमध्ये स्वतःला पाहत असते. म्हणून ज्येष्ठा गौरींचा जिव्हाळ्याचा हा सण अनेक वर्षे परंपरागत पद्धतीने घराघरातून साजरा होत असतो. (Gauri Puja festival)
गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप आहे. स्थळ- परत्वे तसेच परंपरेप्रमाणे गौरींच्या पूजेच्या पद्धतीमध्ये विविधता आढळते. भाद्रपद शुक्ल पक्षात चंद्र अनुराधा नक्षत्रात असतांना गौरी आवाहन म्हणजे गौरी आणल्या जातात. ज्येष्ठा नक्षत्रावर त्या पुजल्या जातात आणि चंद्र मूळ नक्षत्रात असतांना त्यांचे विसर्जन केले जाते. काही घरी परंपरेप्रमाणे गौरींबरोबरच गणेशमूर्तीचेही विसर्जन केले जाते. काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही घरात धान्याच्या राशींवर गौरींचे मुखवटे ठेवून त्याचे पूजन केले जाते. काही घरी गौरींची मूर्ती तयार करून त्याची पूजा केली जाते. तर काही घरी तेरड्याची रोपे मुळासकट आणून त्यांची पूजा केली जाते. (Gauri Ganpati )
माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. ज्येष्ठा गौरीना पुरणाचा नैवेद्य अर्पण करतात. काही घरी परंपरेनुसार नैवेद्यात १६ भाज्या, १६ कोशिंबीरी, १६ चटण्या, १६ पक्वाने असे पदार्थ असतात. १६ दीप प्रज्वलित करून आरती केली जाते. मातृका या १६ आहेत. म्हणून १६ अंकाला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. (Gauri Ganpati )
भारतात फार प्राचीन कालापासून गौरीचे पूजन केले जात असले तरी हे सर्व पूजन पोथ्यां पुराणातच राहिले असे दुर्दैवाने म्हणावे लागते. आपण एखाद्या देवतेचे किंवा देवाचे पूजन का करतो तर त्या आदर्शाचे गुण आपल्या अंगी यावेत. समाजात त्या गुणांचे अनुकरण केले जावे हा त्यामागचा खरा उद्देश असतो. परंतु शक्तीचे हे पूजन फक्त देवघरातच राहिले. ते स्वयंपाकघर, माजघरापर्यंत किंवा घराच्या उंबरठ्याबाहेर आलेच नाही असे दिसून येते.
घरात वावरणाऱ्या आजी, आई, मुलगी, बहीण, पत्नी, सून या जिवंत शक्तीदेवता तशाच दुर्लक्षित राहिल्या. याचे वाईट वाटते. परकीय आक्रमणांमुळे वाटणारी असुरक्षितता है जरी कारण देण्यात येत असले तरी यातूनही मार्ग काढता आला असता. ही आद्यशक्ती, निर्मितीशक्ती तशीच दुर्लक्षित राहिली. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' हे वाक्य ग्रंथातच राहिले. साहित्य, संगीत, कला, कायदा, शिक्षण, राजकारण, आरोग्य, क्रीडा, विज्ञान तंत्रज्ञान, संरक्षण, उद्योग व्यवसाय अर्थकारण, संशोधन इत्यादी सर्वच क्षेत्रात 'गौराईनी' आपले देवत्व- कर्तृत्व सिद्ध करून दाखविले आहे. (Gauri Puja festival)