

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : विवाहितेचा विनयभंग करीत घरात घुसून पीडितेच्या कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, चार दिवसांनंतर राज्याच्या गृहविभागाने त्याला निलंबित केले आहे. बुधवारी याबाबतचे आदेश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नारळी बाग येथील 30 वर्षीय पीडितेचा कारमध्ये विनयभंग केल्यावर आरोपी सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे याने पीडितेच्या घरी जाऊन पती, दिरासह नातेवाईकांना धमक्या देत मारहाण केली होती. त्यांच्या बेडरुममधील वॉशरूम वापरण्यासाठी हट्ट करून धिंगाणा घातला होता.
१५ जानेवारीला पहाटे २ वाजता हा प्रकार घडला होता. दरम्यान, १६ जानेवारीला ढुमेला अटक केली. न्यायालयने त्यांना जामिन मंजूर केला. या प्रकरणाला तीन दिवस उलटले मात्र, ढुमे यांच्या निलंबनाचे आदेश आले नव्हते. दरम्यान, आ. प्रदीप जेस्वाल, विश्वनाथ राजपूत, कुणाल खरात, गौतम खरात यांच्यासह महिलांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. या प्रकारामुळे कुटुंबिय दहशतीत असून त्यांच्या जिवाला ढुमेंपासून धोका होऊ शकतो, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे ढुमे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे मंगळवारी केली होती. त्यांनतर बुधवारी हे निलंबनाचे आदेश आले.