

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथील रवींद्र रावसाहेब बर्डे (वय 24 वर्षे) या विवाहित तरूणाचा विजेच्या तारेवर पाय पडल्याने शॉक बसून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आरडगाव शिवारात विजेच्या तारा पडलेल्या होता. पाऊस व वादळी वार्याने अनेक ठिकाणी झाडे व विजेच्या तारा उन्मळून पडल्या आहेत. दरम्यान, तांदूळवाडी येथील रवींद्र बर्डे हा शेतकर्यांकडे मजूर म्हणून कामाला होता. सकाळी शेतकर्यास, 'मी जेवण करायला जातो,' असे म्हणत तो घराकडे निघाला होता, परंतु, तनपुरे-वाघ यांच्या शेताच्या बांधावर वीज प्रवाहयुक्त तार कोसळलेली होती.
या तारेवर रवींद्र बर्डे याचा पाय पडला. विजेचा जबर शॉक लागून त्याचा जागीच मृत्यु झाला. ही दुर्घटना पाहताच लगतच्या शेतकर्यांनी घटनास्थळी धाव घेत रवींद्र बर्डे याला जखमी अवस्थेत राहुरी येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारास आणले. परंतु, वैद्यकीय अधिकार्यांनी रवींद्र यास मृत घोषित केले. मृत रवींद्र यांच्या पश्चात वडील, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.