औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : वृध्द महिलेच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून जवळपास १ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या बांगड्या हिसकावणाऱ्या अट्टल चोरट्यास गुन्हेशाखा पोलिसांनी औरंगाबादेमध्ये जेरबंद केले. अनिल सेवकराम जिवनानी (४५, रा. संतराम हॉस्पिटलमागे, उल्हासनगर, मुंबई) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
याबाबतची माहिती अशी की, उल्हासनगर येथील रहिवासी रेखा किशनचंद जसवानी (वय ७५) या १२ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरात एकट्या असताना त्यांच्या घरात घुसला. रेखा या घरात एकट्या असल्याचे पाहून अनिल जिवनानी याने त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकली. त्यांच्या हातातील जवळपास दीड लाख रुपये किंमतीच्या (४ तोळे वजन) सोन्याच्या दोन बांगड्या हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर येथे चोरी करणारा अनिल जिरनानी हा औरंगाबादेत आला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. याच्या आधारे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके, पोलीस अंमलदार विजय निकम, दत्तात्रय गढेकर, राजेंद्र साळूंके, संजय मुळे, अमोल शिंदे, राजाराम डाखूरे, महिला पोलीस अंमलदार संजीवनी शिंदे आदींच्या पथकाने गुलमंडी येथे सापळा रचला. अनिल जिवनानी याला ताब्यात घेत अटक केली.
हेही वाचलंत का?