बारामतीच्या जिरायत भागातील तलाव वाहू लागले | पुढारी

बारामतीच्या जिरायत भागातील तलाव वाहू लागले

मोरगाव; पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील जिरायत भागातील ओढे, नाले, कर्‍हा नदी दुथडी भरून वाहत आहे. आंबी, जोगवडी, मुर्टी मोढवे, तरडोली, चांदगुडेवाडी, बाबुर्डी, कार्‍हाटी नदीच्या काठावरील व जलस्रोतांच्या नजीकचे नाले, पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पाझर तलावानजीक असणार्‍या पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्या आहेत. आंबी खुर्द, मोढवे, तरडोली येथील ओढे, नाले, पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पाझर तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

मोढवे येथील पुरंदर पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. मागील महिन्यात तलाव कोरडा होता. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मात्र, सप्टेंबर मध्ये झालेल्या पावसाने त्यांची चिंता मिटली आहे. जोरदार पावसाने पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. वाकीचा, तरडोली तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.  या तलावाची पाहणी तहसीलदार विजय पाटील, जि. प.चे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, आंबी खुर्दचे उपसरपंच गौरव गाढवे आदींनी केली. त्यांनी पाण्याचे पारंपरिक पध्दतीने  पूजन केले.

Back to top button