शोध सुखाचा : अपेक्षा हवी.. पण

शोध सुखाचा : अपेक्षा हवी.. पण

[author title="सुजाता पेंडसे" image="http://"][/author]

प्रत्येक माणूस हा सुखी किंवा दु:खी का असतो? याचे एक महत्त्वाचे उत्तर आहे, ते अपेक्षा. आपल्या मनात असलेल्या अनेक विषयांबद्दलच्या अपेक्षांचे पुरे होणे, न होणे या दोन गोष्टी माणसाला सुखी ठरवू शकतात किंवा असमाधानी करतात. मग अपेक्षा करायच्याच नाहीत का? तसे तर होणार नाही. जसे जसे माणसाला समजू लागते, तसे अपेक्षा निर्माण होतात आणि वाढत राहतात.

अपेक्षांचे दोन प्रकार असतात, एक व्यक्तीच्या स्वत:कडून असलेल्या अपेक्षा किंवा दुसर्‍याकडून असलेल्या अपेक्षा. या अपेक्षांचे माध्यम असते विचार. सतत मनात येणारे विचार निरखून बघा. त्यातल्या 70 टक्के विचारांमागे या अपेक्षाच असतात. काही हवं असतं, काहीतरी नको असतं. काही थोडंच मनासारखं घडतं. काही वेळा सतत मनाविरुद्ध काही तरी घडतं. हे सगळं अपेक्षांशी जोडलं गेलेलं आहे.
स्वत:ची मनातली इमेज, दुसर्‍यांनी आपली केलेली इमेज आणि बाहेरच्या जगातली सतत बदलणारी परिस्थिती या त्रिकोणाच्या हेलकाव्यात माणसांचे विचार सुरू राहतात.

अपेक्षांचे बरे आणि वाईट असेही दोन भाग असतात. म्हणजे आपल्या बाबतीत चांगलं काही घडावं, ही बर्‍या अपेक्षांमध्ये गणली जाते; तर वाईट काही घडू नये, ही अपेक्षा वाईट अपेक्षांमध्ये गणली जाते.

उदा. 'मला चांगली नोकरी मिळावी !' ही चांगली अपेक्षा आहे. ती प्रयत्नाला प्रवृत्त करते, परंतु 'माझी आहे ती नोकरी टिकायला हवी!' ही अपेक्षा मनात शंका किंवा असुरक्षितता, भय निर्माण करते.

योग्य अपेक्षा या जे मिळवायचं आहे, ते मिळवायला मनात होकारात्मक भावना निर्माण करतात; तर नको त्या अपेक्षा या मिळण्याच्या मार्गातला अडथळा ठरतात.

एक उदाहरण घेऊया. एक मध्यमवयीन स्त्री, जिला चारचाकी गाडी चालवता यावी, ही तिची समजत्या वयापासूनची इच्छा होती. पण आर्थिक परिस्थितीमुळे तिला स्वत:ची कार घेणे शक्य झाले नाही. पुढे तिला पुरेसे पैसे मिळाल्यावर तिने कार घेतली; तेव्हा तिची एक महत्त्वाची इच्छा… अपेक्षा पूर्ण झाली आणि तिचं मन आनंदानं भरून गेलं. मग तिने गाडी चालवायचं प्रशिक्षण घेतलं. परंतु तिला पुरेसा आत्मविश्वास नसल्याने गाडी चालवायला सुरू केल्यावर एकदा गाडी रिव्हर्स घेताना मागे कठड्यावर आपटली. ती घाबरली. कारण गाडीचे नुकसानही खूप झाले होते. असे पुन्हा झाले तर परवडणार नाही हे लक्षात आल्याने गाडी बाहेर न्यायची ठरवली की ती दरवेळी विचार करायची, माझ्या गाडीचे नुकसान एवढे होऊ नये! ही नकारात्मक अपेक्षा तिचा आत्मविश्वास इतका कमी करत गेली की, तिने गाडी चालवणे सोडून दिले. म्हणजे बर्‍या किंवा वाईट अपेक्षा असाही परिणाम घडवतात. कारण प्रत्येक अपेक्षा म्हणजे एक विचार असतो. ज्याला व्हायब्रेशन्स असतात, आणि त्याला अनुभवांनी जोडलेला एक विश्वासही असतो.

आयुष्यात नेहमी आजूबाजूला घडणार्‍या घटना, सभोवतालची माणसे यातल्या प्रत्येकाबद्दल माणूस सतत विचार करत असतो. त्यातूनच दिवसभर छोट्या-मोठ्या अपेक्षा मनात उमटत राहतात. त्या पूर्ण होतात – न होतात, त्यातून आशा-निराशेचा खेळ मनात सुरू राहतो. हे स्वाभाविक असले तरी या प्रत्येकाकडे तुम्ही लक्षपूर्वक पाहिले तर त्याचे दुष्परिणाम टाळता येतात. कसे ते पाहू.

एक तर अपेक्षा करताना त्या वाजवी आहेत, त्याला काही बेस आहे का, हे जाणून घ्यायला हवे. अवाजवी अपेक्षा करणेच मुळात चुकीचे आहे.

भव्य, मोठी स्वप्ने पाहा, असे आपल्याला लहानपणापासून सांगितलेले असते. माणूस नेहमी स्वप्ने बघतोही. तरीही जेव्हा त्याला स्वप्न आणि सत्य यातले अंतर स्वत:लाच जाणवलेले असते, तेव्हा अपेक्षांचा फोलपणाही समजतो. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला स्वत:च्या मालकीचे विमान असावे, अशी अपेक्षा, इच्छा असेल आणि क्षणभर ही कल्पना रंजक व मनाला सुखावणारी वाटली, तरी त्यातून बाहेत येताच त्याला समजलेले असते की, हे आपल्याला शक्य नाही. असा स्वत:च्या अपेक्षेचा फुगा स्वत:कडूनच फुटला तर मग नैराश्य जाणवू लागते.

मग या अपेक्षांचं आणि त्यातून निर्माण होणार्‍या भावनांचं व्यवस्थापन करायचं कसं, हे समजून घेऊया. मुळात अपेक्षा करत राहणं हा मानवी स्वभावधर्म आहे. ती एक डिफॉल्ट सिस्टीम आहे. त्यामुळं अपेक्षा करणं हे चूक नाही. पण त्याच्याशी जोडली गेलेली 'अटॅचमेंट' ही समस्या आहे. ही अटॅचमेंट मनात नको त्या भावना निर्माण करते.

आपला व्यवसाय चांगला असावा, 'जोडीदार (पती/पत्नी) उत्तम मिळावा, मुलांचं शिक्षण, करिअर छान असावं, प्रकृती निरोगी असावी, समाजात नाव कमवावं, अशा असंख्य अपेक्षा प्रत्येक माणसाच्या मनात असतात. बरेचदा त्या अपूर्ण राहतात. त्यातूनच मग हवे ते न मिळण्याचं दु:ख मनात साचत राहतं. हताशा, चीड, नैराश्य जाणवू लागतं आणि त्यातून निर्माण झालेल्या भावना मनात कुठेतरी साठत राहून शरीरावर विविध आजारांच्या स्वरूपात प्रकटतात. तुमच्या शरीराला कधीच आजारी पडायचे नसते. तुमचे विचार, तुमची अपेक्षांशी असलेली अटॅचमेंट यातून शरीराला आजार भेट दिले जातात. म्हणून अपेक्षांशी डिटॅच होणं शिकून घ्या. अपेक्षाच बंद करणं शक्य नसतं; पण त्याला स्वत:शी जोडून घेणं थांंबवा.

उदा. तुम्हाला चांगली नोकरी हवीय ही रास्त अपेक्षा आहे. पण ती पूर्ण होत नसेल तर सतत त्याबद्दल दु:खी होत राहणं, स्वत:ला कोसत राहणं. नशिबाला दोष देत राहणं, ही झाली अटॅचमेंट. त्यापासून दूर राहायचं असेल तर आहे ती नोकरी मनापासून, प्रेमानं करणं, नव्या नोकरीसाठी प्रयत्न करणं चालू ठेवलं तरी ती मिळेपर्यंत मनात चलबिचल होऊ न देणं, म्हणजे डिटॅचमेंट. एखादी व्यक्ती हवी तशी नाही वागली तरी त्यावर तीव्र प्रतिक्रिया देऊन, स्वत:ला त्रास करून घेऊन मनाची शांती घालवणं ही अटॅचमेंट आहे. मात्र तिचाही काही प्रॉब्लेम असू शकतो किंवा तिने कसं वागावं, यावर आपलं नियंत्रण नसते. त्यामुळे जे आपल्या नियंत्रणात नाही, त्यावर कितीही विचार केला, दु:खी झालं, तरी परिस्थिती बदलत नाही, तेव्हा ते शांततेने स्वीकारणं ही डिटॅचमेंट.

दिवसभरात तुम्ही कुणाकुणाकडून काय काय अपेक्षा करता, याबद्दल एकदा तरी विचार करा. त्यात स्वत:चं गुंतणं किती आहे, त्याचे स्वत:वर काय काय परिणाम होताहेत, हे नीट समजून घ्या. स्वत:कडूनही ज्या अपेक्षा करतो आहोत, त्याही खरंच बरोबर आहेत का, की काही चुकतंय याचाही विचार करा आणि स्वत:ला, दुसर्‍याला माफ करून टाका आणि नको तो विचार मनात येताच सरळ 'कॅन्सल… कॅन्सल… कॅन्सल…' असे तीन वेळा मनात उच्चारून तो डिलिट करून टाका. स्वत:च्याच फायद्यासाठी हे करायचे आहे, हे लक्षात असूद्या.
खरोखर असे जेव्हा कराल, तेव्हा समजून येईल की, नकोशा विचारांची किती तरी भेंडोळी मनाच्या कपाटात साठवून ठेवली आहेत. ती काढून टाकली तर मनाला स्वच्छ, शांत आणि प्रसन्न वाटते आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news