दुर्दैवी ! कुलर सुरु करताना विजेचा धक्का बसल्याने १२ वर्षीय बालिकेचा मृत्यू, जळगावात हळहळ | पुढारी

दुर्दैवी ! कुलर सुरु करताना विजेचा धक्का बसल्याने १२ वर्षीय बालिकेचा मृत्यू, जळगावात हळहळ

जळगाव- तालुक्यातील किनोद गावात घरातील कुलर सुरू करण्यासाठी विजेचे बटन सुरू करत असताना 12 वर्षीय बालिकेचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (दि. १२) रोजी दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

तालुक्यांतील किनोद गावात अक्षदा किशोर मोरे (वय १२) ही आई आणि दोन बहिणींसह राहत होती. तिचे वडील किशोर मोरे यांचे एक वर्षांपूर्वी कर्करोगाच्या दुर्धर आजाराने निधन झाले आहे. तर आई ही हात मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवत आहे.  दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घरात गरम होत असल्याने चिमूरड्या अक्षदाने कुलर सुरू करण्यासाठी विजेचे बटन दाबण्याचा प्रयत्न केला. अक्षदा किशोर मोरे हिला विजेचा जोरदार धक्का बसल्याने अक्षदा ही जोरात फेकली गेली. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी शेजारच्या नागरिकांच्या मदतीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी तिला मयत घोषित केले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा –

Back to top button