Nashik Murder : सराईत गुन्हेगाराला संपवणारे पाच संशयित अल्पवयीन | पुढारी

Nashik Murder : सराईत गुन्हेगाराला संपवणारे पाच संशयित अल्पवयीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जबरी चोरी केल्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल असलेल्या संशयिताचा एका टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याची घटना फुलेनगर परिसरात सोमवारी (दि.२५) मध्यरात्री घडली. नीलेश श्रीपत उपाडे (२१, रा. दिंडोरी रोड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मारेकऱ्यांमध्ये पाच अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

नीलेश याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असून, तो पंचवटी परिसरात दहशत करण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, नीलेशविरोधात मुंबईनाका, पंचवटी व नाशिकरोड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर तो पंचवटीत राहत होता. दरम्यान, परिसरासह आपल्यावर दहशत करण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्याचे इतर मित्र संतापले होते. नीलेश आपली चेष्टा करतो, याचा राग संशयितांना होता. त्यामुळे संशयितांनी नीलेशवर हल्ला करण्याचा कट रचला. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री एक वाजता नीलेश हा मित्र उमेश साबळेसाेबत फुलेनगरातील म्हाडा बिल्डिंगजवळ उभा असताना, संशयित तेथे आले. त्यांनी नीलेशवर धारदार शस्त्रांनी वार करून पळ काढला. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पाेलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक विलास पडाेळकर, पीएसआय के. एस. जाधव आदी दाखल झाले. त्यांनी चौकशी करीत खून करणाऱ्यांचा शोध सुरू केला. त्यात सहापैकी पाच अल्पवयीन असून, पोलिसांनी पाच अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले असून विश्वास बाबर यास पोलिसांनी अटक केली आहे.

नातलगांचा ठिय्या

नीलेशच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी नातलगांनी पंचवटी पोलिस ठाण्यात काही वेळ ठिय्या दिला होता.

पहिलेपासून वाद

संशयित मारेकरी व नीलेश यांच्यात पुर्वीपासून वाद होते. त्यातून त्यांच्यात अनेकदा मारहाणीचे प्रकार घडले. पंचवटी पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोन अदखलपात्र गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केल्या होत्या. मात्र तरीदेखील त्यांच्यातील वाद मिटला नसल्याचे उघड झाले. टोळीतील वर्चस्ववादातूनही नीलेशवर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button