मालेगाव : मनपा शिक्षण मंडळ कार्यालयातच चोरी | पुढारी

मालेगाव : मनपा शिक्षण मंडळ कार्यालयातच चोरी

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

मालेगाव महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या कार्यालयात चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी (दि. २६) उघडकीस आला. धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीत फाटलेल्या अवस्थेतील राष्ट्रध्वज आढळून आल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचे समोर आले आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला असून या घटनेला दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच महापालिकेची काही कागदपत्रे बुनकर बाजारात रद्दीत आढळल्याचा प्रकार ताजा असतानाच आता मनपा शिक्षण मंडळाच्या इमारतीत चोरी होऊन दफ्तर गहाळ झाल्याच्या घटनेने महापालिकेच्या इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी सकाळी शिक्षण मंडळाचे कार्यालय चोरट्यांनी फोडले असल्याची बाब समोर आली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी येथे धाव घेतली. यावेळी कार्यालयाचे दरवाजे तोडलेले होते, तर आतील दफ्तर अस्ताव्यस्त झाल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच महापालिका उपायुक्त सुहास जगताप, सहायक आयुक्त सचिन महाले यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली, त्यावेळी हा प्रकार समोर आला.

धक्कादायक म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाहणीत देशाचा राष्ट्रध्वज फाटलेल्या अवस्थेत आढळून आला. हा राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचा प्रकार बघून सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित मनपा कर्मचाऱ्यांनी जाब विचारला असता त्यांनी बेजबाबदार उत्तरे दिल्याने सामाजिक कार्यकर्ते 7 अवस्थेत अधिकच संतप्त झाले. चोरीची घटना आणि न झाल्याचा राष्ट्रध्वजाचा अपमान यास जबाबदार असलेल्या उपस्थित संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबन कारवाई करावी नता त्यांनी या मागणीसाठी बोरसे यांनी आयुक्त रवींद्र जाधव यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता. दरम्यान उपायुक्त जगताप यांनी घडल्या प्रकाराची माहिती घेत लिपिकांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

महापालिकेत वारंवार चोरीच्या घटना घडत असून आज शिक्षण मंडळात घडलेली चोरी आणि राष्ट्रध्वजाचा अपमान ही घटना गंभीर आहे. महापालिकेच्या गलथान कारभाराचे पितळ यामुळे उघडे पडले आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. -रामदास बोरसे, सामाजिक कार्यकर्ते

घडलेला प्रकार गंभीर असून याची दखल घेतली आहे. शिक्षण मंडळ कार्यालयातून नेमकी कोणती कागदपत्रे गहाळ झाली की, चोरी करण्यात आली यासंदर्भात तपास करण्यात येत आहे. उपायुक्त जगताप यांनी पंचनामा केला आहे. संबंधितांना नोटिसा बजावल्या असून योग्य कारवाई केली जाईल. – रवींद्र जाधव, आयुक्त तथा प्रशासक, मनपा

Back to top button