वेटलँड्स इंटरनॅशनल या जागतिक संस्थेने दिलेल्या भारतातील पाणथळ आरोग्य स्कोअर अहवालामध्ये महाराष्ट्रातील पाणथळांविषयी चिंता व्यक्त केली होती. ही चिंता काहीशी खरी ठरत असून, नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील पाणथळ क्षेत्राचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. अभयारण्याची सीमारेषा निश्चित न करणे गाळपेरामधील वाढते अतिक्रमणे आणि वाहून येणारी पाणवेली आदी पाणचळ धोक्यात येण्याची कारणे आहेत. या सर्व परिस्थितीमुळे अभयारण्याला मिळालेला रामसरचा दर्जा जाण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे.
'पाणथळ प्रदेश आणि मानवी कल्याण' या थीमवर २०२४ मध्ये जागतिक पाणथळ दिन जगभरात साजरा केला जात आहे. १९७१ मध्ये झाणमधील कॅस्पियन समुद्राच्या किना-यावरील रामसर वा शहरात 'पाणथळ प्रदेशांचे महत्व' या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस 'वर्ल्ड वेटलँड्स डे' अर्थात जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा, असा निर्णय या परिषदेत घेतला गेला. बदक, करकोचे, बगळे, रोहित तसेच शिकारी प्रजातींच्या अनेक पक्ष्यांना पाणथळ भूमीतून अधिवास मिळतो. हे पक्षी या अन्नसाखळीतला महत्त्वाचा दुवा ठरतात. ज्या पाणथळ जागेवर एकाच वेळी २० हजारांहून अधिक पक्षी आढळतात. तसेच त्या ठिकाणचे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान समजून, ठिकाणांना 'रामसर'चा दर्जा प्राप्त होतो. महाराष्ट्रातील पहिले रामसर दर्जा मिळालेले नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य पाणथळ यादीत २४१० क्रमांकावर असून, भारतातील ३१ वे, तर महाराष्ट्रातील पहिले स्थळ ठरले आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाडजवळ असलेले नांदूरमध्यमेश्वर म्हणजे गोदावरी व कडवा नद्यांच्या संगमावर बांधलेल्या धरणामुळे तयार झालेला विशाल जलाशय होय. १९०७-१९१३ दरम्यान येथे बंधारा बांधला गेला होता. गेल्या एक शतकात गाळ साचून तसेच वनस्पतींची वाढ होऊन या ठिकाणी पक्ष्यांसाठी उत्कृष्ट असा अधिवास निर्माण झाला. पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी धरणातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी संबंधित विभागांबरोबर संपर्क साधून वनविभागाला काम करावे लागणार असून, स्थलांतरित पक्षी नेमके येतात कुठून याचीदेखील माहिती वनविभागाला ठेवणे आवश्यक राहणार आहे. अशी पाणवळ जागा हजारो पक्ष्यांना आकर्षित करते या ठिकाणी २७२ पक्षी प्रजातीची नोंद केली आहे. दरवर्षी या ठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांची संख्या २० हजाराहून अधिक असते. मात्र आता पक्ष्यांचा हा अधिवास धोक्यात आला आहे.
नांदूरमध्यमेश्वरचे हे वैभव धोक्यात आले आहे.
– ५३६ प्रकारच्या वनस्पती, आठ प्रकारचे सस्तन प्राणी, २७२ प्रकारचे पक्षी, ३२ प्रकारचे मासे, ५२ प्रकारची फुलपाखरे.
– २० हजारांहून अधिक पक्ष्यांचा किलबिलाट.
– लालसरी, पांढरा करकोचा, सामान्य क्रौंच, मोर शराटी आदी पक्ष्यांच्या गणसंख्येत एक टक्क्यापेक्षा अधिक घट.
– पाणथळ माशांच्या देशी जाती
असे उपाय करता येतील
– पाणथळ जागेचे संवर्धन करणे.
– अभयारण्याची सीमारेषा निश्चिती
– गस्ती पथकासाठी वाहन.
– दिंडोरी तासगावजवळील ५५ हेक्टर राखीव क्षेत्राला कुंपण
– धरणातील पाण्याचे नियोजन
– नाशिक शहरातून वाहून येणाऱ्या पाणवेलीवर कायमस्वरूपी उपाययोजना
पक्षी अभयारण्यातील अधिवास संवर्धनासाठी आम्ही काम करत असून, पक्ष्यांना बसण्यासाठी जेटी तयार करणार आहोत. अभयारण्यातील पाणथळ संवर्धन करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांत पाणथळ प्रदेश आणि मानवी कल्याण या थीमवर जनजागृती करण्यात येईल. – शेखर देवकर, प्रभारी सहायक वनसंरक्षक.