मार्चपूर्वी मराठा आरक्षण मार्गी लावणार : मुख्यमंत्री | पुढारी

मार्चपूर्वी मराठा आरक्षण मार्गी लावणार : मुख्यमंत्री

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : एक मार्चनंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. तत्पूर्वी, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहे, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.

हिवाळी अधिवेशनाचा समारोप बुधवारी झाला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आमचे सरकार पारदर्शक, सकारात्मक व संवेदनशील आहे. जे बोललो ते करतोय, यापूर्वीच्या सरकारने मराठा आरक्षणासंबंधी योग्य बाजू न्यायालयात मांडली नाही, असा आरोप करतानाच राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे त्यांनी सांगितले.

मराठा व इतर समाजांनी संयम ठेवावा. ओबीसी व इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता आम्ही मराठा आरक्षण देणारच, अशी सुस्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. निवडणूक आचारसंहिता यात आड येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विधिमंडळाचे पुढील अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून होणार असून, याच विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष जैस्वाल उपस्थित होते.

Back to top button